सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक मंडळांनी 5 सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या ई मेलवर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. राज्यस्तरीय पहिला क्रमांक मिळवणार्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास 5 लाखांचा पुरस्कार मिळणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
सन 2023 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त किंवा स्थानिक पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी या संस्थेच्या ारहेीींर्रीं.श्रिवरऽसारळश्र.लेा या ई मेलवर दि. 5 सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज केलेल्या मंडळांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हास्तरीय समिती करणार आहे. जिल्ह्यातून एका मंडळाची शिफारस राज्य समितीकडे केली जाणार आहे.
राज्यातील पहिल्या 3 विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास 5 लाख रूपये, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रूपये, तृतीय क्रमांकास 1 लाख रूपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या जिल्ह्यातील एका मंडळास 25 हजार रूपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी
केले आहे.
सहभागी होणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड निकषांच्या आधारे केली जाणार आहे. 10 निकषांसाठी 150 गुण देण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनीप्रदूषणरहित वातावरण, प्रबोधनपर देखावा किंवा सजावट, सामाजिक उपक्रम किंवा कार्य, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक कार्य, महिला किंवा ग्रामीण भागातील वंचित घटकांचे शैक्षणिक, अरोग्य व सामाजिकविषयक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्पर्धा, पारंपरिक किंवा देशी खेळांच्या स्पर्धा, गणेशभक्तांसाठी देण्यात येणार्या प्राथमिक सुविधा (पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, शिस्त, परिसर स्वच्छता, वाहतुकीस विना अडथळा) अशा 10 मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी 150 गुण दिले जाणार आहेत