Food Adulteration : हॉटेल्स, टपरीवरचा चहा..भेसळ किती पहा

धान्यात माती-दगड : तांदळात प्लास्टिकचा वापर
Tea
TeaFile Photo
Published on
Updated on
आदेश खताळ

सातारा : चहाची चुस्की, कॉफीचा घोट असो किंवा घरातील भाकरी-पोळीचा घास, यातील प्रत्येक अन्नपदार्थामध्ये भेसळखोर घुसले आहेत. चहापुडीमध्ये वापरलेली चहापूड वाळवून तिच्यामध्ये कृत्रिम रंग मिसळून पुन्हा नव्या पॅकिंगमध्ये ती विकली जाते. कॉफीमध्ये चिकोरी आणि तृणधान्याची पावडर मिसळली जाते. तांदूळ व गव्हामध्ये दगड, माती, प्लास्टिकचे कण किंवा निकृष्ट दर्जाचे धान्य मिसळून नफा कमावला जातो. प्लास्टिकचे कृत्रिम तांदूळ तयार करून त्याची भेसळ चांगल्या तांदळात केली जात असल्‍याचे प्रकार उघडकीस आले आहे.

चहापुडमध्ये भेसळ करणारी टोळी सक्रिय असून ही भेसळ अतिशय बेमालूमपणे केली जाते. हॉटेल, रेस्टॉरंट किंवा चहाच्या टपर्‍यांमधून वापरलेली चहापूड गोळा केली जाते. ही चहापूड उन्हात वाळवली जाते. त्यावर कृत्रिम रंग फवारून ती ताज्या चहापुडीत मिसळून पॅकिंग केले जाते. ताजा रंग दिसत असल्याने ग्राहकांना फरक कळत नाही. कॉफीमध्ये चिकोरी मिसळणे इतके सामान्य झाले आहे की काही कंपन्या उघडपणे कॉफी-चिकोरीची भेसळ करतात. मात्र, या भेसळीचे प्रमाण लपवले जाते. बर्‍याचदा कॉफीतील चिकोरीचे भेसळीचे प्रमाण 80 टक्के असते. तरीही अशी भेसळीची कॉफी शुद्ध म्हणून विकली जाते.

तांदूळ आणि गव्हामध्ये गोदामातच भेसळ केली जाते. जुने, निकृष्ट, कीड लागलेले धान्य नव्या धान्यात मिसळले जाते. प्लास्टिकचे कण चाळणीतून निघणार्‍या आकाराचे असल्याने सहजासहजी ओळखता येत नाहीत. आयात होणार्‍या चहा व कॉफीची किंमत जास्त असल्याने त्यामध्ये भेसळ करून नफा काढला जातो. वापरलेली चहापूड मोफत किंवा अत्यंत स्वस्तात मिळत असल्याने तीच चहापूड पुन्हा विकल्यास प्रचंड नफा मिळतो. धान्यातील भेसळीमुळे वजनात व दर्जामध्ये फरक पडतो. दगड व माती मिसळल्यामुळे अन्नधान्याचे वजन वाढते. त्यातून प्रचंड पैसे कमवले जातात.

सातार्‍यासह जिल्ह्यातील इतर शहरांतील हॉटेल्स, रेस्टॉरंट किंवा चहाच्या टपर्‍यांमधून वापरलेली चहापूड गोळा करणारे एजंट कार्यरत आहेत. गोळा केलेली ही पूड शहरालगत असलेल्या गावांतील गोदामांमध्ये वाळवली जाते. याच ठिकाणी चहापूडमध्ये कृत्रिम रंग मिसळला जातो. अशी निकृष्ट चहा पावडर लोकल ब्रँड किंवा राष्ट्रीय ब्रँडच्या पॅकिंगमध्ये बाजारात आणली जाते. सातारा जिल्हा कृषीप्रधान असला तरी इथल्या बाजारपेठा भेसळीपासून अलिप्त नाहीत. घाऊक धान्य व चहापूड विक्रेत्यांकडे लूजमध्ये विक्री केली जाते. कराड तसेच फलटण बाजारपेठेतील गोदामांमध्ये धान्य भेसळ केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. वाई, महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे असल्याने हॉटेल व टपर्‍यांमधून वापरलेली चहापूड मोठ्या प्रमाणात गोळा होतो. खंडाळा, फलटण या निमशहरी भागातील छोट्या गिरण्यांमध्ये धान्य भेसळ केली जात आहे. धान्य भेसळ रोखण्यासाठी बाजार समित्या, मार्केट यार्ड, बझार, मॉलमध्ये येणार्‍या धान्याचे नमुने नियमित तपासणे आवश्यक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

वापरलेल्या चहापूडमुळे लिव्हरचे नुकसान होते. कॅन्सरचा धोका वाढतो. कॉफीतील चिकोरीच्या अतिप्रमाणामुळे रक्तदाब, पचनाचे विकार होतात. धान्यातील माती व दगडाच्या भेसळीमुळे आतड्यांना इजा होते. प्लास्टिकच्या कणांमुळे कॅन्सर व हार्मोन्स संतुलन बिघडते. निकृष्ट धान्याच्या भेसळीमुळे अल्फाटॉक्सिन विषबाधा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news