सातारा : फलटणमध्ये शाळकरी मुलींच्या वादातून माय-लेकींना मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

सातारा : फलटणमध्ये शाळकरी मुलींच्या वादातून माय-लेकींना मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

फलटण; पुढारी वृत्तसेवा :  फलटण तालुक्यातील एका गावामध्ये रविवार दि. 23 रोजी दोन शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून एका कुटुंबातील व्यक्तींनी माय-लेकीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी विनयभंगासह 'पोक्सों'तर्गत चौघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या व पीडित महिलेच्या तक्रारीवरून मिळालेली माहिती अशी, फलटण तालुक्यातील संबंधित गावामध्ये पीडित महिला व संशयित दोन्ही कुटुंबे राहण्यास आहेत. या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींमध्ये गावातील वृद्धाश्रमासमोर रविवार दि. 23 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास भांडण झाले. मुलींच्या भांडणाच्या कारणावरून पालकांमध्ये प्रथम वादावादी झाली. हमरीतुमरीवरून प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. संशयित व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित महिला व त्यांची अल्पवयीन मुलगी यांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करून पीडित महिलेचा व अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या तक्रारीनुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. सध्या गावात शांततेचे वातावरण आहे. सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस तपास करत आहेत.

फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात दोन मुली खेळत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. मुलींच्या वादानंतर त्या ठिकाणी आलेल्या त्यांच्या पालकांमध्येही वादावादी झाली. याबाबत मारहाण, जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग झाल्याची तक्रार झाली असून योग्य दिशेने तपास चालू आहे. तपासात जे पुरावे हाती येतील ते न्यायालयासमोर सादर करण्यात येतील. या घटनेबाबत कोणीही अफवा पसरवू नये, अन्यथा स्वतंत्रपणे कारवाई करू.
– समीर शेख, जिल्हा पोलिस अधीक्षक, सातारा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news