

Udayanraje Bhosale on Terrorism
सातारा: जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलरोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले होते. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी या हल्ल्यावर संताप व्यक्त करून पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, माणसे मारणार्या अतिरेक्यांना कोणतीही जात आणि धर्म नाही. पेहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर तर अनेक दुर्दैवी बाबी पुढे येत आहेत. गुन्हेगारीसाठी अल्पवयीनांचा उपयोग केला जात आहे. कायद्याने अल्पवयीनांना शिक्षा देता येत नसल्याने त्यांच्या हाती बंदुका देऊन दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत.
वास्तविक, अतिरेक्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प उद् ध्वस्त केले पाहिजेत. तसेच वयाचा मुलाहिजा न बाळगता अतिरेक्यांचा खात्मा केला पाहिजे, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज (दि.३) सकाळी छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा देखील झाली. यावेळी लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याच्या गाथा शालेय शिक्षणात समाविष्ट कराव्यात. ज्याच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात कोणत्याही पध्दतीचे अडथळे मोठे वाटणार नाहीत. ते त्याविरुद्ध लढतील आणि विजय मिळवतील. महाराजांनी बांधलेले गड किल्ले आज देखील दिमाखात उभे आहेत. हा त्यावेळच्या इंजिनिअरिंगचा भाग असून आता विदयार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे, असेही मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी सुनील काटकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.