

पुणे: छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी पैसे दिले होते. मात्र, हे पैसे कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी वापरले गेले. वाघ्या कुत्र्याचे इतिहासात कोणतेही पुरावे सापडत नसून, ही समाधी रायगडावरून कायमस्वरूपी हटविण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी केली.
पुण्यात महात्मा फुलेवाडा येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते, त्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटविण्याची मागणी केली.
उदयनराजे म्हणाले की, रायगडावर गेल्यावर तुम्हाला तुमच्यासमोर वाघ्या कुत्र्याची प्रतिमा दिसावी की शिवाजी महाराजांची प्रतिमा? इंदूरचे होळकर असतील, बडोद्याचे गायकवाड असतील, त्यानंतरचे शिंदे असतील, नागपूरचे भोसले असतील, हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार होते. कालांतराने काय झाले? भाग वेगळा आहे.
वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ब्रिटिशांना त्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितले की, तुम्ही यांच्यासाठी का काम करताय? आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य आहे का? हे ब्रिटिश आपल्याला सांगणारे कोण होते? हा देश आपला आहे. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असताना पैसे देण्यात आले होते.
हे पैसे महाराजांच्या समाधीसाठी दिले होते. तेच कुत्र्याच्या समाधीसाठी वापरण्यात आले. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतात बघितलाय का? ही ब्रिटिश कुत्री आहेत. त्यामुळे ती समाधी काढून टाका. ती समाधी कशाला पाहिजे रायगडावर? असा सवाल देखील राजेंनी या वेळी उपस्थित केला. ‘नको त्या कुत्र्याचं जास्त कौतुक करायला. त्या समाधीचा विचार जास्त नको करायला? काढून टाका ती समाधी,’ असे उदयनराजे म्हणाले.
शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल उदयनराजे म्हणाले की, अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक व्हावे. जर स्मारक तिथे शक्य नसेल तर दिल्लीत गव्हर्नर हाऊसच्या जागेत व्हावे. गव्हर्नरला जागा लागतेच किती? त्या ठिकाणी 48 एकर जमीन आहे. तशी घोषणा व्हावी, असे उदयनराजे म्हणाले.