Dr. Smita Jadhav | डॉ. स्मिता जाधव मताधिक्याचा विक्रम करतील : ना. शिवेंद्रराजे 

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील विजयासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन
Dr. Smita Jadhav
Dr. Smita Jadhav | डॉ. स्मिता जाधव मताधिक्याचा विक्रम करतील : ना. शिवेंद्रराजे Pudhari
Published on: 
Updated on: 

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या उमेदवारीमुळे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांत चैतन्य निर्माण झाले आहे. उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांना विधान परिषदेत पाठवण्यासाठी पदवीधर मतदारांनी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव मताधिक्याचा विक्रम करतील, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.

पुणे येथे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी ना. शिवेंद्रराजे बोलत होते. बैठकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, आ. धैर्यशील कदम आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने समाजातील प्रश्‍नांची जाण असलेल्या आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या उमेदवारांना पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून संधी दिली आहे. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्‍न विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहात प्रभावीपणे मांडणे आवश्यक असते. या दोन्ही घटकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी भाजपचे उमेदवार तत्परतेने काम करतील. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील पदवीधर मतदार सुज्ञ असून ते महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आ. डॉ. अतुल भोसले म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवण्यासाठी भाजपने सूक्ष्म नियोजन केले आहे. बूथनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. मंडल अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रचार आणि संघटनात्मक काम सुरू आहे. नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या कामामुळे डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास आ. डॉ. भोसले यांनी व्‍यक्‍त केला.

पदवीधरांनी भाजपाच्या पाठीशी ठाम राहावे : ना. जयकुमार गोरे

ना. जयकुमार गोरे म्‍हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत योग्य उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात प्रचारदौरे सुरू असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पदवीधर आणि शिक्षकांनी आपल्या कल्याणासाठी भाजपच्या उमेदवारांना संधी द्यावी. डाॅ. स्मिता जाधव या खऱ्या अर्थाने पदवीधरांचे सक्षम नेतृत्व करतील. त्यांना पक्षाने दिलेल्या संधीचे निश्‍चितच सोने होईल, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला.

logo
Pudhari News
pudhari.news