

कराड : “समाजमनाचा आरसा आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करणारे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक ‘पुढारी’ हे माझ्या आयुष्यातील राजकीय व सामाजिक वाटचालीचे आधारस्तंभ राहिले आहे,” अशा शब्दात सातारा-सांगली विधानपरिषद सदस्य धैर्यशील कदम यांनी ‘दैनिक पुढारी’चे कौतुक केले.
आमदार कदम यांनी बुधवारी पुढारी कराड विभागीय कार्यालयास भेट दिली. कार्यालय प्रमुख सतीश मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. आ. कदम यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली. यावेळी ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‘सिंहायन’ हे आत्मचरित्र आ.कदम यांना भेट दिले. यावेळी जि.प.सदस्य सागर शिवदास, भाजपा कराड शहर प्रमुख एकनाथ बागडी उपस्थित होते.
आ. कदम म्हणाले, “२००९ पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राजकीय व सामाजिक काम करीत आहे. या प्रवासात दोन वेळा अपयश आले. २०२४ मध्ये निवडणुकीतून थांबावेही लागले. मात्र, पक्षावरील अढळ निष्ठा आणि नेत्यांवरील विश्वास कायम ठेवत कार्यकर्ता म्हणून काम सुरू ठेवले. पक्षासाठी आणि सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकपणे काम करीत राहिलो. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्या कामाची दखल घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ना. चंद्रकांत पाटील तसेच श्री.छ.खासदार उदयनराजे भोसले, ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना.जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याची संधी मिळाली. यावेळी पुढारी परिवारातील सदस्य उपस्थित होते.