शिव्या देणार्यांना इतिहास लक्षात ठेवत नाही : फडणवीस
सातारा : समाजाची सुधारणा, तरुणांचा विकास नुसत्या भाषणाने होत नाही. त्यासाठी कार्ययोजना करणे गरजेेचे असते. प्रामाणिकपणे काम करताना तसेच परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करत असताना अनेक राजकीय पक्षांचे लोक मला टार्गेट करतात. माझ्यावर उलट-सुलट बोलतात. मी त्याला प्रतिक्रिया देत नाही, कारण इतिहास हा शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असा प्रहार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातार्यात विरोधकांवर केला.
दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातही शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह उभे करावे, अशी मागणी केली. या मागणीला दुजोरा देत ना. फडणवीसांनी सातार्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभे करण्याची घोषणा केली. स्व. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त प्रयत्नाने मराठा समाजातील 1 लाख तरुणांना कर्जपुरवठा करण्यात आला. या उद्योजकांचा सत्कार सोहळा ना. फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, ना. महेश शिंदे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. डॉ. दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, सुनील काटकर, राजू भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, महामंडळाचे व्यवस्थापक अनिल पाटील, रमेश पाटील, विक्रम पावसकर, वसंतराव मानकुमरे, डॉ. दिलीप येळगावकर, प्राची पाटील, चित्रलेखा माने-कदम, सुवर्णा पाटील, रेणू येळगावकर, सुरभी भोसले, डॉ. प्रिया शिंदे, कविता कचरे, अश्विनी हुबळीकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ना. फडणवीस म्हणाले, स्वराज्याच्या राजधानीत छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेवून मराठा समाजातील उद्योजकांचा सन्मान केला जात आहे. या सत्कार सोहळ्याला मला बोलावल्याबद्दल आ. शिवेंद्रराजेंचे मी मनापासून आभार मानतो. महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख उद्योजक निर्माण होणे, हा महत्वाचा टप्पा आहे. आता 5 लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मला ज्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तेव्हाच अगदी सुरुवातीच्या काळात मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी अत्यंत शांततेने मोर्चे काढले. त्यानंतर मराठा समाजाच्या विकासासाठी नेमके काय केले पाहिजे, याचा विचार सुरु झाला. मराठा समाजाने अठरा पगड जातींना सोबत घेऊन वर्षानुवर्षे गावगाडा सांभाळला. मात्र, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज मागास राहिला. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला. याचा फायदा तरुण-तरुणींना होतोय. आता इथून पुढे देखील दिलेले मराठा आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवून दाखवू. वर्षाला 25 ते 26 हजार शासकीय नोकर्या निघतात. त्यातून वर्षाकाठी 2600 नोकर्या मराठा समाजाला मिळत आहेत. मात्र केवळ नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे तरुण निर्माण झाले पाहिजेत, या भावनेतून महामंडळाची पुनर्रचना आम्ही केली. ना. नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तरुणांना कर्ज नाकारणार्या बँकांना एफआयआर करण्याचा इशाराही दिला. सततच्या प्रयत्नांमुळे बँकांनीही महामंडळाच्या माध्यमातून प्रोेजेक्ट रिपोर्ट करुन मराठा तरुणांना कर्जे दिली. गरीब कुटुंबातील तरुणांना दिल्लीत राहून युपीएससीची तयारी करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी सारथीसारखी संस्था तयार केली. त्या माध्यमातून युपीएससी, एमपीएसीमध्ये तरुण सिलेक्ट होत आहे. अनेक आयएएस अधिकारी, डीवायएसपी तरुण सारथीच्या माध्यमातून झाले, याचा मला मनापासून आनंद होतो, असेही ना. फडणवीस म्हणाले.
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचा आम्ही निर्णय घेतला आणि हे आरक्षण टिकवून ठेवले आहे. यामुळे मराठा तरुणांना नोकर्यांमध्ये संधी मिळाली. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत मराठा तरुणांना जागा मिळाल्या. जवळपास 1 लाखांची भरती प्रोसेसमध्ये आहे, असेही ना. फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणासाठी आम्ही शिंदे समितीची निर्मिती केली. राज्यात सर्वत्र कुणबी नोंदी शोधून काढल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी आग्रही आहेत. आपण सर्व अठरापगड जातींना सोबत घेऊन काम करु. मराठा समाजाची अस्मिता त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे. सर्व प्रश्नांतून समाजाला बाहेर काढू, असा विश्वास ना. फडणवीस यांनी व्यक्त केला. आमच्या सरकारने कायद्यात टिकेल, असे निर्णय घेतले. चुकीचे निर्णय घेऊन आम्हाला पळून जायचं नाही. महामंडळाद्वारे उद्योजक बनलेल्या तरुणांनी आपल्या समाजातील 5 जणांना उद्योजकतेसाठी प्रेरित केले तर उद्योजकांचा संच तयार होईल, असे ना. फडणवीस म्हणाले.
ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवेंद्रराजेंनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी होस्टेल (वसतीगृह) उभे करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वसतीगृहासाठी जागा उपलब्ध केली तर सातार्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी राज्य शासन होस्टेल बनवेल. विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा तरुण-तरुणी यांना एसटी, एससी, ओबीसी प्रमाणे सवलत मिळावी, अशी मागणी होत होती, त्यानुसार 507 कोर्सेसमध्ये 1600 कोटी रुपये फी सवलत देण्याचा निर्णय घेतला. मुलींकरिता तर मोफत शिक्षणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असेही ना. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालयांच्या इमारतींचे उदघाटन ना. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठा समाजातील लाभार्थ्यांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.