

खटाव : पुढारी वृत्तसेवा : अनेक अडथळ्यांवर मात करून आणि पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती मिळाली आहे. या योजनेसाठी एकूण आठ टीएमसी पाणी आणि ७३७० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा माण आणि खटावला सर्वाधिक लाभ होणार आहे. सुजलाम, सुफलाम माण-खटाव स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह व्हिडीओद्वारे केले.
या योजनेच्या पाठपुराव्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आ. गोरे यांचे कौतुकही केले विखळे फाटा येथे टेंभू योजनेच्या कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अंकुश गोरे, सोनिया गोरे, अरुण गोरे, चिन्मय कुलकर्णी, डॉ. संदीप पोळ, शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, गणेश सत्रे, टी. आर. गारळे, सुरेश शिंदे, रामभाऊ देवकर, प्रा. बंडा गोडसे सिद्धार्थ गुंडगे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज टेंभू योजनेची कामे सुरू होत आहेत. त्यांनी फेरवाटपातून पाणी आणि निधी उपलब्ध केल्याने योजना पुढे जात आहे. पाणी संघर्ष समितीनेही यासाठी परिश्रम केले आहेत. मी जनतेला पाण्याबाबत शब्द दिले ते पूर्ण करताना राजकीय आणि जनतेची ताकद मिळत गेली. दोन वर्षात कामे पूर्ण करुन टेंभूचे पाणी देण्याचा शब्द मी दिला आहे.
औंधसह वीस गावांची योजना मार्गी लागत आहे. पवारांनी जनतेला झुलवत ठेवले. त्यांनी या भागाला दुष्काळी ठेवायचे पाप केले म्हणूनच जयकुमार नावाचे रोपटे इथे उगवले, वाढले आणि त्यांच्याच मुळावर उठले. म्हसवड औद्योगिक वसाहतही मार्गी लागत आहे. ठरलयवाल्यांनी त्यांचे लवकर ठरवावे. मला रात्रीचे फोन यायला लागलेत. त्यांचा उमेदवार जाहीर होताच त्यातील काही माझ्या स्टेजवर दिसतील, असे असे सांगून आ. गोरेंनी खळबळ उडवून दिली.
यावेळी शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, टी. आर. गारळे, रघुनाथ घाडगे यांनी मनोगतात आ. जयकुमार गोरे यांनी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न केल्याने टेंभू योजनेच्या कामांना सुरुवात होतानाचा सुवर्णक्षण अनुभवता आला, असे सांगितले.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे पवारांसह अनेक बडे नेते पाणीच नाही तर देणार कुठून असे विचारायचे. माझे स्वप्न आज जयाभाऊंमुळे पूर्ण होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने फक्त झुलवत ठेवले. मायणीचा तत्कालीन लाल दिवा निळा झाला पण त्यांनी आपल्या भागासाठी कधी पाणी मागितले नाही. जयंत पाटील आणि प्रभाकर देशमुख सर्वाधिक खोटारडे असल्याचेही डॉ. येळगावकर म्हणाले.