

नाशिक : उत्तर महाराष्ट्राला जलस्वयंपूर्ण करणाऱ्या नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याने कसमादेसह खानदेशातील शेतकरी सुजलाम-सुफलाम हाेणार आहेत, अशी भावना पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. जिल्ह्याच्या पालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भुसे यांनी प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. (Farmers of Khandesh are going to be Sujlam-Suphalam - Dadaji Bhuse)
पालकमंत्री भुसे यांनी, 'नार-पार'मुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होणार असून, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या संघर्षाला न्याय दिला आहे. आजपर्यंत अनेकांनी राजकारण केले. मात्र आपल्या सरकारने न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतून पश्चिमीवाहिनी नार-पार-गिरणा नदीखोऱ्यातून 10.64 टीएमसी पाणीवापर प्रस्तावित असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, सटाणा, नांदगाव व इतर तालुक्यांना होणार आहे. 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. सुमारे 7,015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नार-पार प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या व पश्चिमेकडे वाहून जात अरबी समुद्रास जाऊन मिळणाऱ्या नद्यांचे पाणी वळविले जाणार आहे. नार-पारसह तीन पश्चिमवाहिनी नद्यांवर सुरगाणा तालुक्यात नऊ धरणे बांधण्यात येणार आहेत. या धरणांतून पाणी उपसा करून गिरणा उपखोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे आभार मानले आहे.