सातारा जिल्ह्यातील 5 अधिकार्‍यांवर गुन्हे

file photo
file photo
Published on
Updated on

डीवायएसपी घनवट, एएसआय शिर्केंवर खंडणीचा गुन्हा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील गुरूकुल स्कूल शिक्षण संस्थेप्रकरणी सातारा एलसीबीचे तत्कालीन पोनि व सध्याचे डीवायएसपी पद्माकर घनवट व सहाय्यक फौजदार (एएसआय) विजय शिर्के यांच्यावर खंडणी, जबरी चोरीसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र चोरगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून सातारा जिल्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर सोमवारी याबाबत हालचालींना वेग आला. याबाबत राजेंद्र चोरगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2017 साली चोरगे कुटुंबीय व शाळा प्रशासनाला सातारा एलसीबी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांची ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत चोरगे यांनी कायदेशीर सोपस्कार केले. यानंतर डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन एसपी पंकज देशुमख यांच्याकडे चोरगे यांनी घनवट व शिर्के यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज केला. या अर्जासोबत चोरगे यांनी पोलिसांनी कशा पद्धतीने त्रास देऊन पैसे मागितले आहेत याचे पुरावे दिले. यामध्ये पोलिस 25 लाख रुपयांची मागणी करून त्यातील 12 लाख 30 हजार रुपये घेतल्याचेही म्हटले आहे.

एसपी पंकज देशमुख यांनी याची गंभीर दखल घेवून दोन्ही पोलिस अधिकार्‍यांची प्राथमिक चौकशी त्यावेळचे सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे लावण्यात आली. पुढे एकूण पाच अधिकार्‍यांनी दोघांची चौकशी केली. यातूनच शिर्के यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मात्र दोन्ही पोलिसांविरुध्द भक्कम पुरावे असल्याने सर्वसामान्यांप्रमाणे त्या पोलिसांवर योग्य तो गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चोरगे तत्कालीन पोलिस अधीक्षकांकडे करत होते. मात्र नेमक्या कारवाईची प्रक्रिया होत नव्हती. अखेर चोरगे यांनी जानेवारी 2023 मध्ये सातारा न्यायालयात प्रायव्हेट तक्रार दाखल केली. कोर्टाने ही तक्रार पाहून सीआरपीसी 1973 चे कलम 156 (3) प्रमाणे या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सातारा शहर पोलिसांना कोर्टाची ऑर्डर मिळाल्यानंतर सोमवारी व मंगळवारी गतीमान हालचाली झाल्या. अखेर मंगळवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात डीवायएसपी पद्माकर घनवट व एएसआय विजय शिर्के यांच्यावर खंडणी, जबरी चोरी यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

पोनि निंबाळकर, सपोनि माने पतसंस्थेमुळे अडचणीत

सातारा: पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील जयभवानी नागरी पतसंस्थेतील कारभाराप्रकरणी पतसंस्थेचे सभासद शंकर माळवदे यांनी आर्थिक गैरव्यवहाराबाबत सहकार विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. याचा राग मनात धरून पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांनी माळवदे यांचे सभासदत्व रद्द केले. याबाबतचे पुरावे घेऊन ते सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि भगवान निंबाळकर व सपोनि राजेश माने या पोलिसांना भेटले असता त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. यामुळे माळवदे सातारा जिल्हा न्यायालयात गेले असता पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांसह पोलिसांवरही गुन्हा दाखल (एफआयआर) करण्याचा आदेेश कोर्टाने केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जयभवानी पतसंस्थेचे माळवदे यांचे सभासदत्व पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांनी आपापसात संगनमत करून, कट रचून त्यांचे सभासदत्व रद्द केले. सभासदत्व रद्द करताना संबंधितांनी खोटी कागदपत्रे तयार करून त्यावर बोगस सह्या करण्यात आल्या होत्या. याचे इतिवृत्त तयार करून ते दस्ताऐवज शासकीय कामात खरे असल्याचेही भासवण्यात आले. हे सर्व पुरावे एकत्र तयार करुन सातारा शहर पोलिस ठाण्यात माळवदे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

सातारा शहर पोलिसांना सर्व कागदपत्रे देवून अदखलपात्र गुन्हा करण्याची विनंती केली असतानाही त्यांनी टोलवाटोलवी करत प्रकरण धुडकावून लावले. पोलिसांकडून दखलपात्र गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर शंकर माळवदे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात धाव घेतली. नुकतेच याबाबत न्यायाधीशांनी सीआरपीसी 156 (3) याप्रमाणे पोलिसांसह पतसंस्थेच्या संबंधित एकूण 13 पदाधिकार्‍यांवर प्रथम खबरी अहवाल नोंदवून (एफआयआर) पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना शंकर माळवदे म्हणाले, पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करुन आयते पुरावे देवूनही त्यांना गुन्ह्यातील गंभीरता समजली नाही. यामुळेच आपण सातारा जिल्हा न्यायालयात गेलो. याठिकाणी गेल्या आठवड्यात ऑर्डर झाल्याचे वास्तव असताना अद्याप शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी आपण न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करत आहे.

आरटीओ वाहन निरीक्षक कागदपत्रे चोरीत अडकला

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील क्लार्कने मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर व एजंट संतोष शिंदे या दोघांविरुद्ध कागदपत्रे चोरल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सागर शिवाजी लाळगे (वय 35, रा. दौलतनगर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते आरटीओ कार्यालयातील क्लार्क आहेत. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित दोघांनी गैरसमज करून घेऊन त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यातूनच 'तुला कामाला लावतो', अशा धमक्या दिल्या. संबंधित दोघांनी गेल्या एक वर्षापासून वेळोवेळी त्रास दिला. यातूनच तक्रारदार यांच्यासंबंधी कामकाजाची असलेली कागदपत्रे गहाळ झाली. कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले व त्या कागदपत्रांसंबंधी माहिती अधिकाराखाली माहिती मागवण्याचे उद्योग अन्य मार्गाने राबवले. याबाबतची सर्व माहिती घेतल्यानंतर संशयित दोघांनी तक्रारदार यांची कागदपत्रे चोरल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात जाऊन दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news