पाटण : पुढारी वृत्तसेवा
पाटण तालुक्यात गावोगावी पालकमंत्र्यांनी विकासाचे फलक लावले आहेत. फलकावरील विकासकामे प्रत्यक्षात गावात किती साकारली याचा ताळमेळ बसत नाही. अनेक कामे केवळ फलकावरच दिसत आहेत. जी काही कामे झाली ती निकृष्ट दर्जाची आहेत. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. याचे पुरावे आमच्या हाती लागले आहेत. विकासकामांच्या नावावर पाटण तालुक्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जन आक्रोश महामोर्चा पाटण येथे काढणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील, उपतालुका प्रमुख भरत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. हर्षद कदम म्हणाले, गावोगावी लागलेल्या विकास फलकावर अनेक कामे महाविकास आघाडी काळातील आहेत. काही कामे आताची आहेत. ज्या कामांमध्ये दर्जा निकृष्ठ आहे त्याच्यावरती विद्यमान पालकमंत्री काही बोलणार आहेत का? निकृष्ट कामांबद्दल जबाबदारी कोण घेते? पाटण तालुक्यात टक्केवारीचा विषय वारंवार येतो त्याची जबाबदारी कोण घेणार..? टक्केवारी मध्ये कोणकोणाचे हात आहेत यावरती कोण बोलणार? या सर्व प्रश्नांवर पालकमंत्री मुग गिळून गप्प का? पालकमंत्र्यांनी तालुक्यातील जनतेला स्वतः उत्तर द्यावे असे आवाहन हर्षद कदम यांनी केले आहे.
आमच्याकडे विकासकामातील भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. हे पुरावे घेऊन भ्रष्ट सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जन आक्रोश महामोर्चा शुक्रवारी दि. 27 सप्टेंबर रोजी पंचायत समिती, पाटण ते तहसीलदार कार्यालय पाटण येथे दुपारी एक वाजता होणार आहे. पाटण तालुक्यात अधिकार्यांच्यावर दबावतंत्र सुरू आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जनतेचे आहेत का पालकमंत्र्यांचे हेच समजत नाही. तालुक्यातील सर्व सामान्य माणूस स्वतःच्या कामासाठी शासकीय कार्यालयात जातो तेंव्हा तिथे अधिकारी हजर नसतात. अधिकारी कुठे आहेत चौकशी केल्यानंतर साहेबांच्या बैठकीला, मिटिंगला गेल्याचे सांगितले जाते. शासकीय कार्यालयातील अधिकार्यांच्या अनुपस्थितीमुळे सामान्यांची कामे खोळंबली आहेत.
पाटण तालुक्यातील रोजगार बंद करुन बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी तालुक्यात दारु दुकान, बिअर बारची संख्या वाढवून तरुणांच्या हातात ग्लास देण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. त्यांच्या राज्य उत्पादन शुल्क मंत्री पदाच्या कार्यकालात पाटण तालुक्यात बारची संख्या वाढली असल्याचा आरोप हर्षद कदम यांनी केला आहे.