

Contractor Drowns in Well Azadpur Koregaon
सातारा : आझादपूर (ता. कोरेगाव) येथील गुजरडोह नावाच्या शिवारातील एका विहिरीवर काम करणारा २२ वर्षीय ठेकेदार हा लोखंडी प्लेट आणण्यासाठी विहिरीच्या कडेला गेला असता पाय घसरून विहिरीत पडला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. विलास अशोक चव्हाण (वय २२) असे बुडालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. सायंकाळपासून ग्रामस्थ व युवक त्याचा शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर ५५ फूट खोल विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला यश आले.
आझादपूर येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवर सिमेंटची रिंग टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विलास अशोक चव्हाण या ठेकेदाराने घेतले आहे. या कामावर स्वतः चव्हाण व इतर कामगार काम करत आहेत. सर्वजण हे विजयपूर जिल्ह्यातील आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे विहिरीवर आरसीसी रिंग टाकण्याचे काम सुरू होते. विलास चव्हाण व अन्य एक युवक तिथे काम करत होता. लोखंडी प्लेट आणण्यासाठी विलास चव्हाण विहिरीकडे गेला असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडला.
त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या सहकाऱ्याबरोबरच विहीर मालकाने पाण्यात उडी घेतली, मात्र तोपर्यंत चव्हाण विहिरीच्या तळापर्यंत खाली गेला होता. विहीर मालकाने गावातील युवकांना माहिती दिल्यानंतर अनेकांनी विहिरीत उडी घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र विलास चव्हाण यांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. अखेरीस पोलिसांनी ग्रामस्थांची चर्चा करून सातारा येथील शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सला पाचारण केले आणि अथक प्रयत्नातून त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलीस फौजफाटा तैनात केला होता.