

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये पर्यावरण संवर्धनाच्या द़ृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि सातारा नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने 1 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस परेड ग्राऊंड येथे वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमामुळे सातार्यात जणू ‘ग्रीन मिशन’ सुरू झाल्याचे चित्र निर्माण होणार आहे.
विविध मान्यवरांची उपस्थिती जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सातार्यात हे वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, कार्यकारी अभियंता (पश्चिम) राहुल अहिरे, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, दिशा कमिटीच्या सदस्या रेणू येळगावकर, हरित सातारा संस्थेचे कन्हैयालाल पुरोहित आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दोन हजारहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट या अभियानात 8 ते 10 फूट उंचीची विविध प्रकारची 2 हजार 800 झाडे लावण्यात येणार आहेत. सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे 110 कर्मचारी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पोवई नाका ते वाढे फाटा या दरम्यान 3.3 कि.मी. लांब मार्गाच्या दुतर्फा 1 हजार 514 झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यात बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, बकूळ, पुत्राजिवा, कडूनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यांसारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश असणार आहे. यासोबतच 330 एक्झोरा व पावडर पफसारख्या आकर्षक सजावटीची झाडेही लावली जाणार आहेत.
नगरपरिषदेच्या वतीने विशेष मोहीम सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सातारा नगरपरिषदेच्या वतीने याच दिवशी वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात होणार आहे. आयोध्यानगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक-नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदरबझारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, ताम्हीण, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशा विविध प्रकारची 1 हजार 200 झाडे लावली जातील.
या भव्य वृक्षलागवड मोहिमेमुळे सातारा जिल्ह्याचा पर्यावरणी समतोल सुधारण्यास मदत होणार आहे. ‘हरित सातारा, स्वच्छ सातारा’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरणार आहे. या अभियानात सहभागी होणार्यांना नगरपालिकेकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव यांनी केले आहे.