वेण्णालेकवरील घोड्यांच्या विष्ठेमुळे नागरीकांना आजार; ‘सीएसडी’चा निष्कर्ष

वेण्णालेकवरील घोड्यांच्या विष्ठेमुळे नागरीकांना आजार; ‘सीएसडी’चा निष्कर्ष

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वरमध्ये पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण असलेल्या वेण्णा तलाव परिसरातील मैदानात अनेक वर्षे घोडेसवारीचा व्यवसाय केला जातो. मात्र, पर्यटकांचे आकर्षण ठरणार्‍या घोड्यांच्या विष्ठेमुळे (लिद) शहरात रोगराई पसरत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने नागरीकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड असे आजार होत आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

'गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे'च्या 'सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट' (सीएसडी) या संस्थेच्या माध्यमातून 'आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प' हाती घेतला होता. या प्रकल्पासाठी महाबळेश्वर पर्यटनस्थळाची निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रा. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली हे काम झाले. महाबळेश्वरमध्ये जे संसर्गजन्य रोग होतात त्याची कारणे तपासली असता घोड्यांच्या विष्ठेमुळे हे होत असल्याचे दिसून आले.

महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या वेण्णा तलावाच्या पाण्यासह इतर सर्व स्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे, घरे, व्यावसायिक आस्थापना व भूजल यांचे सखोल नमुने घेण्यात आले. सर्व पिण्याच्या पाण्याच्या, भूजलाच्या नमुन्यांमध्ये प्रदूषण दिसले. त्यानंतर संशोधकांच्या पथकाने या प्रदूषणाचा उगम शोधला. या शोधाअंती घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा व वेण्णा तलावालगत उभ्या असलेल्या घोड्यांची विष्ठाही पाण्यात मिसळत असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय महाबळेश्वरमधील सर्व रस्त्यांवर आणि पाण्याच्या पाईप लाईनलगत घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा आढळतो. घोड्यांच्या विष्ठेमध्ये इतर प्रदूषणाव्यतिरिक्त विषाणू आणि जीवाणू असल्याने पाणी दूषित होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news