Uttarmand River Flooding : उत्तरमांड नदीच्या पुराचा ऐतिहासिक वारशाला धोका

श्रीराम पेठेतील २५ ते ३० घरे, दुकाने संकटाच्या छायेत; दरवर्षी पावसाळ्यात बसतो मोठा फटका
Uttarmand River Flooding
Uttarmand River Flooding pudhari photo
Published on: 
Updated on: 

चाफळ : राजकुमार साळुंखे पावसाळा संपला असला, तरी चाफळमधील उत्तरमांड नदीच्या पुराचा धोका कायम आहे. दरवर्षी पावसाळ्यात नदीला येणाऱ्या महापुरामुळे पुरातन बुरूज, घाट, महादेव मंदिरासह श्रीरामपेठ परिसरातील २५ ते ३० घरे आणि दुकाने धोक्यात येतात. पुढील वर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या उत्तरेसून उत्तरमांड नदी वाहते. अतिवृष्टीच्या काळात नदीला मोठा पूर येत असल्याने नदीपात्रालगत असलेल्या दोन पुरातन बुरुजांची आणि घाटाची मोठ्या प्रमाणातदुरवस्था झाली आहे. नदीच्या प्रवाहामुळे पात्राची धूप होत असून, श्रीरामपेठ परिसरातील घरांच्या अंगणापर्यंत पाणी पोहोचते. मुस्लिम वस्तीतील घरांनाही याचा धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे परिसरातील दुकानदारांचेही नुकसान होते.

Uttarmand River Flooding
Suhas Babar | डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करा : आ. बाबर

गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या सार्वजनिक विहिरीत दरवर्षी पुराचे गढूळ पाणी शिरते. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील महादेव मंदिरालाही पुराचा फटका बसत असल्याने या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्याची गरज आहे.

वेळीच उपाययोजना न केल्यास चाफळचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्यातील पुरामुळे दरवर्षी नुकसान होत असून मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर नदीकाठ खचू लागला असल्याने भिती व्यक्त होत आहे. श्रीराम देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने शासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.

Uttarmand River Flooding
Fertilizer : खतासाठी रांगेत उभे राहण्याचे दिवस संपणार!

महादेव मंदिर ते बसस्थानकापर्यंत मजबूत संरक्षण भिंत उभारावी, सार्वजनिक विहिरीचे संरक्षण करावे तसेच मंदिराकडे जाण्यासाठी नवीन फरशी पूल बांधावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्नात लक्ष घालून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पुढील पावसाळा सुरू होण्यापूर्वी संरक्षणात्मक कामे पूर्ण झाल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळता येईल. त्यामुळे शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन वेळेत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news