सातारा; मीना शिंदे : आधुनिकतेच्या नावाखाली जीवनशैलीत होणारे बदल धोकादायक ठरत आहेत. वाढते ताण-तणाव, चुकीच्या आहार-विहाराच्या सवयी, व्यसनाधीनता, उशीरा वयातील लग्न, संप्रेरकांचे असंतुलन आदींमुळे महिलांच्या रजोनिवृत्तीचे वय अलीकडे आले आहे. पूर्वी 45-50 वर्षात होणारी राजोनिवृत्ती 35 ते 40 वर्षातच येत आहे. गर्भधारणेतील महत्त्वाचा दुवाच निखळत असल्याने महिलांचे आईपणाचे स्वप्नही कमी वयात भंग पावत आहे. गर्भधारणेत अडथळे येत असल्याने वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राहणीमानात बदल झाल्याने गरजाही वाढल्या आहेत. मुला-मुलींकडून करिअरला प्राधान्य दिले जात असून नोकरी-व्यवसायात स्थिरावल्याशिवाय लग्नाचा विचारच केला जात नाही. उच्चशिक्षितांकडून लग्नासाठी आपल्या जोडीदाराच्या अपेक्षाही वाढत आहेत. परिणामी लग्नाचे वय वाढत आहे. त्यामुळे तिशीनंतर लग्न आणि पस्तीशीनंतर आपत्याचा विचार होत आहे. याची एक बाजू म्हणजे उशीरा वयातील लग्नांमुळे गर्भधारणेत अडथळे येत आहेत. तसेच वाढत्या स्पर्धेमुळे ताण-तणाव, आहार-विहारातील बदल, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा अतिरेक, व्यसनाधीनता यामुळे हार्मोन्समध्ये बदल होत आहेत. या सर्वांमुळे महिलांचे रजोनिवृत्तीचे वय पूर्वीपेक्षा दहा ते पंधरा वर्षे अलीकडे आले आहे.
दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार 2016 मध्ये या वयातील रजोनिवृत्तीचे प्रमाण 1.5 टक्के होते. 2021-22 मध्ये हेच प्रमाण 2.1 टक्केने वाढले आहे. मासिक चक्र हा गर्भधारणेतील महत्त्वाचा दुवा आहे. रजोनिवृत्तीमुळे हा दुवाच निखळला जात आहे. अगदी पस्तीस चाळिशीतच रजोनिवृत्ती आल्याने अशा महिला बाळाला जन्म देण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली, नैसर्गिक गोष्टींमधील मानवी हस्तक्षेप मानवी जीवनास घातक ठरत आहे.
नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यात अडथळे येत असल्याने वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. परंतु विज्ञान तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात केली जात आहे. वंध्यत्व निवारण उपचारांची गरज वाढली आहे. या उपचारांमार्फत आयव्हीएफ, टेस्टट्यूब बेबीसारख्या तंत्रज्ञानातून कृत्रिमरीत्या गर्भधारणा करुन अपत्य जन्माला घालण्याची पध्दत सर्वमान्य होत चालली आहे.
मोठ्या शहरातील मुले-मुली उशिरा लग्न करतात. त्यांच्या या मानसिकतेचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे तरुणाईने तिशीच्या आत लग्न व पस्तिशीच्या आत अपत्य हा नियम पाळावा.
– डॉ. स्मीता कासार, स्त्रीरोग तज्ज्ञ.