

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात 9 वर्षांची सजा भोगून आलेला आरोपी समीर हिंगोराचे पाचगणीतील पंचतारांकित हॉटेल फर्न शुक्रवारी सील करून जिल्हा प्रशासनाने आणखी एक दणका दिला. जिल्हा प्रशासन आणि पाचगणी नगरपालिकेकडून संयुक्तरित्या ही मोठी कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून या हॉटेलच्या एकूण 81 रूम सील करण्यात आल्या. पाचगणी नगरपालिका हद्दीतील ही सगळ्यात मोठी कारवाई समजली जात असून या कारवाईने महाबळेश्वर, पाचगणीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाचगणी व महाबळेश्वर परिसरात अनधिकृत बांधकामाचा उच्छाद निर्माण झाला आहे. त्यातच पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाचे आलिशान हॉटेल जिल्हा प्रशासनाने सील करून त्याचा परवाना निलंबित केल्यानंतर कारवाईचा धडाका आणखी वाढला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अखेर या अनधिकृत व्यावसायिकांना दणका दिला आहे.
हिंगोरा याच्या हॉटेलबाबत अनेक तक्रारीसह बेकायदा बांधकाम झाल्याचा आरोपही होत होता. पोर्शे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाचे कनेक्शन महाबळेश्वरपर्यंत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. दै.'पुढारी'ने हा विषय लावून धरला. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आल्यानंतर त्यांनी अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवण्याचे आदेश दिले. पाठोपाठ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पाचगणी, महाबळेश्वरमधील अनधिकृत हॉटेल व बांधकामे यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. शुक्रवारी समीर हिंगोरा याच्या हॉटेल फर्नला कारवाईचा दणका दिला. हे हॉटेल अनधिकृत बांधल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सहा महिन्यांपूर्वी हे हॉटेल सील करण्यात यावे म्हणून देखील आंदोलन झाले होते.
जिल्हाधिकार्यांनी या आंदोलनानंतर हॉटेल सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र हॉटेल फर्न व्यवस्थापनाने न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती मिळवली होती. मात्र, अखेर शुक्रवार कारवाईचा बडगा उगारला गेलाच. दुपारी एकच्या सुमारास पाचगणीचे मुख्याधिकारी निखिल जाधव, वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील, पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यासह नगरपालिका, महसूल विभाग व पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त पथकाने हे हॉटेल सील केले.
पर्यटकांची गैरसोय; व्यवस्थापन धारेवर
पाचगणी येथील द फर्न हॉटेल हे पूर्वी द ग्रँड विक्टोरिया हॉटेल म्हणून ओळखले जात. अनधिकृत बांधकामामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने ते सील केल्यानंतर या हॉटेलमधील 400 हून पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे या पर्यटकांनी कारवाईनंतर हॉटेल व्यवस्थापनाला धारेवर धरले. या पर्यटकांना आर्थिक फटका बसला असून कारवाईनंतर त्यांच्या वास्तव्याची पंचाईत झाली आहे.