

Palshi Youth Dead Body found in Managanga River
सातारा : मानगंगा नदीत मंगळवारी (दि.२७) वाहून गेलेल्या पळशी येथील युवकाचा मृतदेह ३६ तासानंतर आज (दि.२९) दुपारी नदीपात्रात सापडला. नवनाथचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरल्या असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास लग्न कार्य उरकून घरी परतत असताना पळशी-जाशी रस्त्यावरील माण नदीच्या बंधाऱ्यावरून येताना नवनाथचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात पडला होता. त्यानंतर प्रवाहात वाहून गेला होता.
या घटनेनंतर म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह नगरपालिकेची रेस्क्यू टीमने शोध मोहीम राबवली. परंतु नवनाथ याचा दोन दिवस उलटूनही शोध लागला नव्हता. आज त्याचा मृतदेह नदी पात्रात काटेरी झुडपाला अडकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. यावेळी पाटोळे कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. नवनाथचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.