

मेढा : जावली तालुक्यातील कुडाळ येथील भाजपा कार्यालयात झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणाचे तालुक्यात चांगलेच पडसाद उमटले. दोन्ही गट ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे असतानासुद्धा हा प्रकार घडल्याने भाजप पक्षावर नामुष्कीची वेळ आली आहे. भाजप कार्यालयातच ‘राडा’ झाल्याने या राड्याची चर्चा सोमवारी दिवसभर संपूर्ण जावली तालुक्यात होती.
कुडाळ गावामध्ये अल्पसंख्याक समाजाची दफनभूमी आहे. या दफनभूमीसाठी अल्पसंख्याक समाजातीलच एका ठेकेदाराने पाठपुरावा करून सव्वा कोटीचा निधी मंजूर करून आणला होता. परंतु, गावातील गटबाजीमुळे कागदपत्रांची पूर्तता नसल्याने तांत्रिक मंजुरी मिळालेली नाही. ही वस्तुस्थिती काही ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितली. या दोन्ही गटांमध्ये गेले तीन वर्ष विकासकामांवरून खडाजंगी उडत आहे. यातच शनिवारी एका कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळमधील दोन्ही गट एकत्र आले होते.
भाजप तालुकाअध्यक्ष संदीप परामणे यांच्या उपस्थितीत तालुक्यात पक्षाची बांधणी चांगल्या प्रकारे करायची आहे. तालुक्यात शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून कुडाळमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने येत्या निवडणुकीत मतदान वाढीसाठी प्रयत्न करावा लागेल, असे सांगितले. याचवेळी कुडाळ येथील दफनभूमीचा विषय काहींनी काढला.
यानंतर प्रारंभी शाब्दीक चकमक उडाली नंतर कार्यकर्त्यांना फोन करून बोलावून घेऊन दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळे वातावरण चांगलेच गरम झाले. धक्काबुकी होऊ लागल्याने हा राडा मिटवण्यासाठी ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांना बोलवण्यात आले. परंतु त्यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यालाही या नवीन सेलच्या आणि पदाधिकार्यांच्या कळवंडी सोडवता सोडवता नाकी नऊ आले.
गेल्या पंधरा वर्षांमध्ये प्रथमच एका पक्षाच्या कार्यालयामध्ये अशा कळवंडी आणि बुकला-बुकली झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाली. वसंतराव मानकुमरे तसेच तालुकाध्यक्षांनी संबंधित ठिकाणी धाव घेऊन कळवंड थांबवली.