

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारचा तुरुंग म्हणजे कुणालाही भेदता न येणारी अभेद्य तटबंदी. चारही बाजूला उंचच्या उंच काळ्या दगडांच्या भक्कम भिंती, प्रशस्त व जाडजूड प्रवेशद्वार, ब्रिटिश पोलिसांचा पहाडासारखा बंदोबस्त अशा प्रतिकूल परिस्थितीत ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेणे सोपे नव्हते. मात्र, १० सप्टेंबर १९४४ रोजी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारचा तुरुंग फोडून शौर्य व पराक्रमाची प्रेरणादायी गाथा रचली. 'भारत माता की जय' म्हणत त्यांनी घेतलेली 'क्रांतिकारी उडी' आजही युवा पिढीमध्ये धगधगता रणसंग्राम बनून राहिली आहे.
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी दिलेला लढा शौर्याचे प्रतीक समजला जातो. या लढ्यातील अनेक घटना पराक्रमांची गाथा सांगून जातात. यापैकी सातारा जेलच्या तटावरून नागनाथ अण्णांनी मारलेली क्रांतिकारी उडी आजही साऱ्यांनाच देशभक्तीने प्रेरित करत असते. २९ जुलै १९४४ रोजी नागनाथ अण्णांना ब्रिटिशांनी अटक करून इस्लामपूरच्या जेलमध्ये ठेवले. या जेलमधून नागनाथ अण्णांना रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात सातारा जेलमध्ये आणले होते. अण्णांनी पळून जाऊ नये यासाठी हा आटापिटा करण्यात आला होता. सातारच्या जेलमध्ये दोन-तीन दिवस राहिल्यानंतर नागनाथअण्णांनी तेथील राजकीय कैद्यांशी मैत्री जोडणे सुरू केले. जेलमध्ये राहणे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी ही खंत आपल्या जवळच्या राजकीय कैद्यांशी तसेच जेलमध्ये असलेल्या कामेरीच्या एस. बी. पाटील यांना बोलून दाखवली. एका रात्री अचानक त्यांनी जेल फोडण्याचा विचार बोलून दाखवला.
जेल फोडताना सापडलो गेलोच तर गोळीला बळी पडावे लागणार, हे नागनाथ अण्णांना पूर्ण माहीत होते. मात्र त्याची पर्वा त्यांनी केली नाही.
सातारच्या जेलची रचना विचित्र आहे. आतून त्याचे तट उंच आणि बाहेरून चढावाची भर असलेले कमी उंच शिवाय सर्व तटांवर उभ्या काचा सिमेंटमध्ये बळकट बसवलेल्या होत्या. सातारा जेल फोडताना एस. बी. पाटील म्हणाले, माझी शिक्षा संपत आली आहे. बर्वे गुरुजीही म्हणाले, माझी शिक्षाही संपत आली आहे. शेवटी अण्णा म्हणाले मी जेल फोडून जातो. निदान मला तरी मदत करा.
'मला पकडून इग्रजांनी माझा अपमान केला आहे. त्यांचा पराभव करुन त्यांना धडा शिकवायचा आहे. काही झाले तरी मी तुरुंग फोडणारच' असा इरादा अण्णांनी बोलून दाखवला होता. त्यावर एस. बी. पाटील यांनी जेल फोडून पळून जाण्यासाठी जे नियोजन केले आहे त्या मार्गे तुम्हाला आम्ही मदत करतो असे सांगितले. त्याप्रमाणे या कामासाठी नेर्लेच्या शामू रामा, वशीचा सिटचोर साळी व नागठाण्याचे पोलीस अडिसरे यांचा उपयोग करुन तुरुंग फोडायच्या अगोदर सर्वांनी तुरुंग फोडायची ट्रायल घेतली. सातारा जेलमध्ये येऊन अण्णांना चार दिवस संपणार होते. त्याच दिवशी रविवार दि. १० सप्टेंबर १९४४ रोजी सर्व कैद्यांना अंघोळीसाठी बराकी बाहेर सोडले. प्रथम बर्डे गुरुजी नंतर नागनाथ अण्णा बाहेर आले. बर्डे गुरुजी अंघोळीसाठी हौदाकडे गेले. अडिसरे पोलीस गुरुजींच्या बरोबर गेला. एस. बी. पाटील, साळी व शामू रामा चौघेंही पलायनाच्या भिंती जवळ गेले. साळी व शामू रामू भिंतीकडे तोंड करुन बसले. एस. बी. पाटील दोघांच्या खाद्यांवर बसले तर नागनाथ अण्णा एस. बी. पाटील यांच्या खांद्यावर बसले. नियोजनाप्रमाणे पहिली जोडी उभी राहिली. शेवटी अण्णा उभे राहिले. नागनाथ अण्णा भिंतीवर चढले त्यावेळी उगवत्या सुर्याला साक्ष ठेऊन कसलाही विचार न करता १८ फूट उंचीच्या तटावरुन त्यांनी उडी मारली. तळहाताला थोडीशी इजा झाली बाकी कुठेही खट्ट झाले नाही. ते तिथेच बसून बारीक हराळी उपटू लागले. कुणी पाहिले व एखाद्याला शंका आलीच तर हा माणूस गणपतीला हराळी (दुर्वा ) काढत आहे, असं वाटावं. कारण त्यावेळी घरोघरी गणपती बसवले होते.
अण्णांनी कोणी नाही हे जाणून सरळ सातारा शहराच्या पश्चिम बाजूचा रस्ता धरला आणि ते बेधडक सकाळी ६ वा. च्या सुमारास सोमवार पेठेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घराजवळ आले. त्यांच्या दारावर पाटी होती रयत सेवक सोसायटी. नागनाथ अण्णा तिथे थबकले, दार अर्धवट उघडे होते. बाहेरच्या व्हरांडयात कॉटवर मच्छरदाणी लावलेली होती. कॉटवर कोणीच नव्हते. समोर कर्मवीरांचा फोटो पाहिला आणि त्यांना हिमालयासारखा आधार वाटला. कर्मवीर अण्णा घरी नाहीत, ते पुण्याला गेलेत असे सांगण्यात आले. मात्र नागनाथ अण्णांनी काम आणि नांव टाळले आणि बोर्डींगचे सुपरिटेंडेंट कोठे आहेत त्यांना बोलावता का ? असे विचारले. मावशींनी एका मुलाकरवी बोर्डिंगचे सुपरिटेंडेंट असलेल्या ए.डी. आत्तार यांना बोलावले. ते येईपर्यत नागनाथ अण्णा कॉटवर मच्छरदाणीत गाढ झोपले. स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता जेल फोडून आलेला हा ढाण्या वाघ बंदूकधारी पोलीसांचा ससेमिरा कर्मवीरांमुळे आपल्यापर्यंत पोहोचणार नाही हे जाणून होते. क्रांतिवीर नागनाथ अण्णा हे आज हयात नाहीत मात्र सातारा जेल परिसरातून जाताना त्या क्रांतीकारक उडीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळा 'माझी माती, माझा देश' या उपक्रमाने साजरा होत आहे. यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या व अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची यानिमित्ताने आठवण होते. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पराक्रमाची गाथा सर्वदर पोहोचली आहे. आज ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने अण्णांचे हे शौर्य सायांसाठीच प्रेरणेचा स्रोत बनले आहे.