

अतिवृष्टीने पाच घरांची पडझड; रस्ते खचले
कोयना, कृष्णा इशारा पातळीकडे
महाबळेश्वरात दरड कोसळली
पाणी योजनांना जलसमाधी
Heavy Rainfall Satara
सातारा : जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हाहाकार माजला आहे. कोसळधार सुरूच असल्याने आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने पूर परिस्थिती कायम आहे. प्रमुख नद्यांवरील तब्बल 11 पूल पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. पाच घरांची पडझड झाली असून, जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करत, 129 कुटुंबांमधील 361 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. सातार्यातील कैलास स्मशानभूमीतील 18 अग्निकुंड पुराच्या पाण्याखाली गेले असून, आंबेनळी घाटात दरड कोसळली.
महाबळेश्वर, नवजा, कोयनाधरण परिसर येथे अतिवृष्टी सुरूच असून, जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. कोयना, धोम, कण्हेर, वीर यासह सर्वच धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना नद्या धोक्याच्या पातळीकडे तर इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कृष्णा नदीला पूर आल्याने वाई तालुक्यातील गणपती घाट पाण्याखाली गेला आहे. महागणपती मंदिराला पाण्याचा पूर्ण वेढा असून, लगतच्या महादेव मंदिरातही पाणी गेले आहे. यासोबतच चिंधवली, खडकी, लिंब जिहे येथील जिहे-कठापूर येथील कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. वेण्णा नदीवरील हमदाबाज ते किडगाव व करंजे ते म्हसवे हे दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. पाडेगाव येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कोयना नदीनेही धोक्याची पातळी गाठली असून पाटण तालुक्यातील पाबनपाळा ते नवजा पूल खचला आहे. कराड-हेळवाक पुलावर पाणी आले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे-मजरेवाडी रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
कोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित निवारा शेड, हायस्कूल, शाळा, काहींना नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
यामध्ये पाटण तालुक्यात पाटण शहरात 13 कुटुंबातील 45, हेळवाक येथील 5 कुटुंबातील 17, नावडी, औंध वस्ती येथील 7 कुटुंबातील 15, कराड तालुक्यातील कराड शहर, पत्राचाळ, पाटण कॉलनी, कोयना दूध कॉलनी, रुक्मिणीनगर येथील 6 कुटुंबातील 24, महाबळेश्वर तालुक्यातील येर्णे बु. येथील 8 कुटुंबातील 18, वाई शहरातील 40 कुटुंबातील 135, सातारा तालुक्यातील भैरवगड येथील 30 कुटुंबातील 65, मोरेवाडी येथील 20 कुटुंबातील 42 अशा एकूण 129 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
धोम धरणात 13.18 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 97.85 टक्के धरण भरले आहे. धरणातून 17,274 क्युसेक पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धोम-बलकवडी धरणात 3.82 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 97.79 टक्के धरण भरले आहे, धरणातून 7,329 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कण्हेर धरणात असून 9.57 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 96.93 टक्के धरण भरले आहे. धरणातून 14,823 क्युसेक पाणी वेण्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणात 9.72 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 98.29 टक्के धरण भरले आहे, धरणातून 8936 क्युसेक पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
तारळी धरणात 5.45 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 94.28 टक्के धरण भरले आहे, धरणातून 4,435 क्युसेक पाणी विसर्गाद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वीर धरणात 9.50 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 96.50 टक्के धरण भरले आहे, धरणातून 55,887 क्युसेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान, कोयनेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोयना- 270 मिमी. (3928 मि.मी.), नवजा 387 मिमी. (4822 मि.मी.), महाबळेश्वर 308 मिमी. (4508 मि.मी.), धोम 47 मिमी. (561 मि.मी.), धोम बलकवडी 197 मिमी. (2237 मि.मी.), कण्हेर 49 मिमी. (690 मि.मी.), उरमोडी 62 मिमी. (1217 मि.मी.), तारळी 60 मिमी. (1336 मि.मी.), वीर 14 मिमी. (210 मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील आठ महसूल मंडलांमध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 273 मि. मी. इतका पाऊस महाबळेश्वरात तर त्याखालोखाल लामज 170 मि. मी., तापोळा 109 मि.मी., पसरणी 95 मि.मी., तासगाव 78.3 मि. मी., पाचगणी 72.8 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.