

मेढा : बोंडारवाडी धरण रेषेवर सोमवारी सकाळी ट्रायलपीट घेण्यात येणार असून त्यासंदर्भातील बैठक भुतेघर येथे झाली. यावेळी मेढा पोलिस स्टेशनचे सपोनि सुधीर पाटील यांनी कोणीही ट्रायलपीट घेण्यास अडथळा करू नये अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा सूचना केल्या. दरम्यान, तीनही गावच्या ग्रामस्थांनी या ट्रायलपीटला विरोध केला आहे.
बोंडारवाडी, भूतेघर, वाहिटे या तिनही गावांची बैठक भुतेघर येथील मंदिरात पार पडली. यामध्ये जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोमवारी धरणरेषेजवळ ट्रायलपीट घेण्यात येणार असल्याचे सपोनि पाटील यांनी सांगितले व त्याबाबत उद्या कोणी अडथळा करू नये असे सांगितले. दरम्यान, नियोजित धरण रेषेवर ट्रायलपीट घेऊ नये, आम्हा ग्रामस्थांना दोन दिवस वेळ द्यावा, अशी मागणी तीनही गावच्या ग्रामस्थांनी केली. त्याबाबतचे निवेदन संबधित ग्रामस्थांनी सादर केले.
धरण रेषेवर धरण झाले तर पूर्णतः बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे ही गावे बाधीत होणार असल्याने सदर धरण रेषेसाठी विरोध करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हटले आहे. धरण्याच्या ट्रायलपीटसाठी विरोध असून सुद्धा प्रशासनाची दिशाभूल करून ट्रायलपीट बळजबरीने केली जात आहे. त्यामुळे सदर धरण रेषेवर ट्रायलपीट होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ट्रायलपीटसाठी जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त मागवला असून सोमवारी बोंडारवाडी प्रकल्पाला मुहूर्त सापडतो का नाही? ही बाब स्पष्ट होईल. या बैठकीस तीनही गावचे मुख्य ग्रामस्थ उपस्थित होते.