कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा
बोरगाव, ता. कोरेगाव येथील जवान तुषार राजेंद्र घाडगे (वय 33) यांना मंगळवारी अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या भूस्लखनामध्ये वीरमरण आले. शोकाकुल वातावरणात शुक्रवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तुषार घाडगे हे भारतीय सेना संलग्न बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मध्ये अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत होते. सात वर्षांपासून ते सैन्यदलात कार्यरत होते. मंगळवार, दि. 13 रोजी तुषार घाडगे व त्यांचे दोन सहकारी दुपारी सैन्यदलाकरिता रस्ता बनवण्यासाठी ड्रिलिंगचे काम करत होते. कर्तव्य बजावत असताना अचानक भूस्खलन झाले. यामध्ये भला मोठा दगड तुषार यांच्या डोक्याला लागला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तुषार यांच्या एका साथीदाराला दिब्रूगड (आसाम) येथे हलवण्यात आले आहे. तर दुसरा साथीदारही गंभीर जखमी झाला. जवान तुषार घाडगे हे मंगळवारी शहीद झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव बोरगाव येथे आणण्यात आले. यावेळी गावातील युवकांनी रहिमतपूर ते बोरगाव अशी दुचाकी रॅली काढत त्यांचे पार्थिव घरासमोर आणण्यात आले. त्यानंतर झेंडूच्या फुलांनी व हारांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून जवान घाडगे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे ,जब तक सूरज चांद रहेगा शहीद जवान तुषार घाडगे आपका नाम रहेगा आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोरगाव, वाठार, रहिमतपूर परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
बोरगाव येथील स्मशानभूमीमध्ये प्रशासनाच्यावतीने तहसिलदार डॉ. संगमेश कोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी तालुक्यातील शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सैन्यदलातील अधिकारी व सैनिक आदींनी श्रद्धांजली वाहिली. जवान तुषार घाडगे यांना मुलगा शिवांश याने मुखाग्नी दिला. दरम्यान, जवान तुषार घाडगे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.