जावलीत दीपक पवार-अमित कदम यांच्यात संघर्ष उफाळणार

जावलीत दीपक पवार-अमित कदम यांच्यात संघर्ष उफाळणार
Published on
Updated on

पाचगणी; इम्तियाज मुजावर :  राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणात दुफळी पडल्याने त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटत असून यामुळेे ग्रामिण भागातील राजकारण ढवळून निघाले आहे. पक्ष दुभंगल्याने गावागावात राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या जावलीत आता काही ठिकाणीच राष्ट्रवादीचे अस्तित्व उरल्याचे दिसत आहे. जावलीत आधिच राष्ट्रवादीची ताकद कमी आणि त्यात आणखी दुफळी यामुळे आगामी काळात दीपक पवार आणि अमित कदम यांच्यात संघर्ष उफळणार आहे.

जावलीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर आ. शिवेंद्रराजे भोसले दोनवेळा निवडून आले. नंतर ते भाजपात जावून निवडून आले. जावली तालुक्यात आपल्या डॅशिंग नेतृत्वाने त्यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष पूर्णतः कार्यकर्त्यांसह हायजॅक केला आहे. राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जावलीत दीपक पवार, अमित कदम यांनी राष्ट्रवादी काही प्रमाणात टिकवून ठेवली आहे. आता राष्ट्रवादी पक्षच दुभंगल्याने येथेही गावागावात शरद पवार व अजित पवार गट निर्माण झाले आहेत. अमित कदम हे अजित पवारांकडे तर दीपक पवार हे शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. अमित कदम यांचे काही कार्यकर्ते शरद पवारांकडे गेले आहेत. जावलीत हाताच्या बोटावर शिल्लक असणार्‍या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्येही दुफळी निर्माण झाल्याने तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
जावलीतील राजकारणावर आ. शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाचा मोठा पगडा आहे. त्यामुळे गाव तसेच वाडी वस्तीवर आ. शिवेंद्रराजे हाच आमचा पक्ष अशी धारणा आहे.

काही महिन्यांपूर्वी एकत्रित आलेले अमित कदम, दीपक पवार, सदाभाऊ सपकाळ, आ. शशिकांत शिंदे हे मेढ्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवारांच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. मात्र, आता अजित पवारांनीच शरद पवारांना सोडून वेगळी चूल मांडल्याने कोणाचा झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आहे.

राष्ट्रवादी पक्षात राहून आ. शिवेंद्रराजे गटाशी काही प्रमाणात टक्कर देणारांची या दुफळीमुळे चांगलीच गोची झाली आहे. कारण अजित पवार यांचा गट हा पूर्णतः भाजप सेना युतीच्या सत्तेत सामील झाल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यार्ंना आ. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखालीच आता पुढील वाटचाल करावी लागेल. शरद पवार यांच्या गटात गेलेल्या कार्यकर्त्यार्ंना मात्र, पुढे काय? हाच प्रश्न सतावत आहे.

दरम्यान आगामी काळात होणार्‍या निवडणुकांत कोणत्या राष्ट्रवादीला मतदान करायचे? या संभ्रमात जनता राहील. याचा फायदा आ. शिवेंद्रराजे गटाला नक्कीच होईल.

आ. शिवेंद्रराजे भाजपात गेल्याने राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते येथे एकाकी पडले. आता तर पक्षातच दोन गट पडल्याने तालुक्यात आपले अस्तित्व टिकवताना या कार्यकर्त्यार्ंना तसेच त्यांच्या नेत्यांना कसरत करावी लागणार हे निश्चित. येथे त्यांना आ. शिवेंद्रराजेंशी जुळवून घ्यावं लागणार आहे. तरच अमित कदम अर्थात अजित पवारांचा राष्ट्रवादी गट हा तालुक्यात यशस्वी होईल, असा सूर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे. कदाचीत अमित कदम भविष्यात आ. शिवेंद्रराजेंकडे येतील असेही बोलले जात आहे.

दीपक पवार – आ. शिवेंद्रराजे यांच्यात संघर्ष ठरलेलाच….

पारंपरिक विरोधक असणारे दीपक पवार व आ. शिवेंद्रराजे यांच्यात आगामी काळातही संघर्ष होणारच यात शंका नाही. दीपक पवार, सदाभाऊ सपकाळ, आ. शशिकांत शिंदे असा राष्ट्रवादीचा शरद पवार गट जावलीत निर्माण होईल आणि तोच भाजपा विरोधक राहील.

आ. शशिकांत शिंदे, सदाभाऊ सपकाळ असे आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. तालुक्यात शरद पवारांचा गट मजबूत आहे, कार्यकर्त्यांची फळीदेखील आता ताकतीने उभी राहिली आहे.
– दीपक पवार

जावलीत जर अजित पवारांनी शिवेंद्रराजेशी जुळवून घ्या, असे सांगितले तर नक्कीच कार्यकर्त्यांचा विचार घेऊन जुळवून घेतले जाईल.
– अमित कदम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news