

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी दिवसेंदिवस पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याचे चित्र आहे. तर हॉटस्पॉट असणार्या सातार्याचाही संसर्ग दर झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
यामुळे सातारा जिल्हा तिसर्या टप्प्यात आला असून जिल्हा अनलॉक करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रविवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 6.97 टक्के होता. शनिवारपेक्षा हा दर 2 टक्क्यांनी घसरला.
जिल्हाधिकार्यांनी दि. 5 एप्रिल 2021 पासून लॉकडाऊनचे आदेश जारी केले होते. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. हा लॉकडाऊन दि. 20 जून 2021 पर्यंत सुरू राहिला होता. त्यानंतर दि. 21 जूनपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार आठवड्याचे पाच दिवस निर्बंध घालून सुरू करण्यात आले होते.
अवघे दहा दिवस सुरू झालेल्या बाजारपेठा, जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट वाढल्याने पुन्हा लॉक करण्यात आल्या. आजही अत्यावश्यक गरजेच्या नावाखाली बाजारपेठेत तुडुंब गर्दी होतच आहे. त्यातच सध्या जिल्ह्यात प्रशासनाने टेस्टिंग वाढवले आहे. जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आरटी-पीसीआर चाचण्यांचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट घसरत चालला असून रविवारी तो पॉझिटिव्हिटी रेट 6.97 टक्के राहिला आहे.
पॉझिटिव्हिटी रेट हा कमी होत चालला असल्याने जिल्हा प्रशासनाच्या या आकडेवरून कोरोना संसर्ग कमी झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आता सर्व बाजारपेठा खुल्या करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पॉझिटिव्ह रेट कमी होत असताना बाजारपेठ का खुली केली जात नाही? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. दरम्यान, हॉटस्पॉट राहिलेल्या सातारा शहरातही आता पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊ लागला आहे.