सातारा : रोजलॅन्ड स्कूलमधील तिघा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा | पुढारी

सातारा : रोजलॅन्ड स्कूलमधील तिघा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा

कुडाळ/ भिलार; पुढारी वृत्तसेवा : रोजलॅन्ड स्कूल मधील तिघा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचगणी येथील रोजलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलच्या तीन मुख्य व्यवस्थापकांविरोधात पाचगणी पोलिस ठाण्यात तब्बल 50 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी दोन तक्रारदारांनी महाबळेश्वर न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात धाव घेतल्याने हा गुन्हा दाखल झाला असून पाचगणीच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अभय जगन्नाथ आगरकर (रा. आगरकर मळा, अहमदनगर), सुलतान दुलेखान शेख (रा. सुलतान मस्जिद जुना बाजार, अहमदनगर) व अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत जे. एस. पठाण (वय 60, व्यवसाय सिक्युरिटी एजन्सी रा. रविवार पेठ एमआयडीसी रोड, वाई) यांनी फिर्याद दिली आहे. रोजलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल सिद्धार्थनगर पाचगणी शाळेस होस्टेलसाठी सिक्युरिटी सेवा पुरवण्यासाठी व्यवस्थापकांनी तक्रारदार यांच्याशी बोलणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी सेवा दिली. मात्र, त्या सेवेचा मोबदला सुमारे 19 लाख 79 हजार 915 रुपये इतका झाला; परंतु ही रक्कम न देता संशयितांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, दुसरी तक्रार इर्शाद ताजुद्दीन (रा. डोंगरी म्युनिसिपल गोडावूननंबर एक महेश्वरी रोड मुंबई) यांनी दिली आहे. संशयित तिघांना रोजलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलला किराणा माल पुरवण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी किराणा माल पुरवला. त्या बदल्यात संशयितांनी 30 लाख रुपयांचा धनादेश (चेक) दिला.

मात्र, तो न वटल्याने तक्रारदार यांची फसवणूक झाली. अशा प्रकारे दोन्ही तक्रारदार यांनी महाबळेश्वर कोर्टात धाव घेवून रोजलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत न्यायाधिशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमान्वये तिघांविरुद्ध पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास सपोनि सतीश पवार करत आहेत.

Back to top button