सातारा : कंपनी अधिकार्‍यासह दोघांवर हल्‍ला | पुढारी

सातारा : कंपनी अधिकार्‍यासह दोघांवर हल्‍ला

नायगाव ; पुढारी वृत्तसेवा : विंग, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील रियटर या कंपनीच्या उपाध्यक्षांवर जीवघेणा हल्‍ला (crime news) झाला. यामध्ये हल्‍लोखोरांनी धारदार शस्त्राने वार करून उपाध्यक्ष व चालक यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर शिरवळ पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवत चार हल्‍लेखोरांना अवघ्या 24 तासात अटक केली. या घटनेमुळे खंडाळ्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राजू जोखणप्रसाद गुप्ता (वय 49 रा. चिखली, पुणे), ऋषिकेश विजय रणनवरे (वय 21 रा. राख ता. पुरंदर जि. पुणे) रामकृष्ण सुभाष अळगी (वय 31 रा. इंदिरानगर, पुणे) व करण विठ्ठल शिंदे (वय 21 रा. बालाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या हल्‍लेखोरांची नावे आहेत.

दि. 27 रोजी रियटर कंपनीचे उपाध्यक्ष किरण रतीलाल कटारिया (वय 52, रा. पुणे) हे कंपनीतील कामकाज झाल्यानंतर चालक अमर दत्तात्रय सोनवणे (वय 29, रा. पुणे) याच्यासह इनोव्हा (क्रमांक एम. एच. 12. आर.एफ. 4393) याच्यासह पुण्याकडे निघाले होते. विंग गावच्या हद्दीतील हॉटेल सुशांत गार्डन जवळ त्यांची कार आली असता पाठिमागून आलेल्या दुचाकीवरील चौघांनी कटारियांच्या इनोव्हाला दुचाकी आडवी मारून इनोव्हा थांबवली.

यानंतर काही क्षणातच धारदार शस्त्राने गाडीची काच तोडून चालक अमर सोनावणे याच्या मानेवर कोयत्याने वार केला. तर अन्य एका दुचाकी स्वाराने कटारिया यांना कारमधून ओढत शिवीगाळ व दमदाटी केली. भंगार कॉन्ट्रॅक्ट बदलल्याच्या कारणातून त्यांच्यावरही धारदार शस्त्राने वार केले. या घटनेनंतर कटारिया यांच्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा (crime news) दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व पोलिस उपविभागीय अधिकारी शीतल खराडे, पोनि किशोर धुमाळ यांच्या सूचनेनुसार शिरवळ पोलिस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ, संजय बोंबले, रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदलवार, जितेंद्र शिंदे सचिन वीर, नितीन महांगरे प्रशांत वाघमारे, मगेश मोझर, सचिन शेलार, दत्तात्रय धायगुडे, संतोष सपकाळ, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, रोहित निकम, सचिन ससाणे पृथ्वीराज जाधव यांच्या पथकाने तत्काळ तपासाची सूत्रे हलवली. तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे व्यवसायिक राजू गुप्‍ता व सराईत गुन्हेगार असलेले ऋषिकेश रणनवरे, रामकृष्ण अळगी, करण शिंदे यांना अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लेबर कॉन्ट्रॅक्टर्सची चौकशी करा…

खंडाळा एमआयडीसीमध्ये अनेक लेबर कॉन्ट्रॅक्टर्सचा सुळसुळाट आहे. काहींना राजकीय व्यक्‍तींचे पाठबळ आहे. तर, काही संघटनांचे बावटे दाखवत आहेत. लेबर कॉन्ट्रॅक्टर्सच्या या धुमाकुळात खंडाळा एमआयडीसी पुरती असंवेदनशील झाली आहे. लोकल पोलिस मॅनेज असल्यामुळे खंडाळा एमआयडीसीकडे जिल्हा पोलिसप्रमुखांनाच लक्ष द्यावे लागणार आहे.

विशेष म्हणजे राजकीय लाभांच्या पदांवर असणारेही लेबर कॉन्ट्रॅक्टर्स म्हणून कंपन्यांमध्ये फिरतात. तालुक्याच्या भूमिपुत्रांना ना कंपन्यांचा लाभ ना लेबर कॉन्ट्रॅक्टर्सचा. उलट यांच्या भांडणात एमआयडीसी तणावपूर्ण झाली आहे. त्याकडे जिल्हा पोलिस प्रमुखांनी लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.

हल्ल्याचे नेमके कारण काय?

कटारिया यांच्यावर हल्‍ला झाल्याची वार्ता कंपनी परिसरासह संपूर्ण एमआयडीसीमध्ये पसरली. कटारिया यांच्यावर हल्‍ला नेमका का झाला? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. नेमक्या कोणत्या ‘प्रकरणा’वरून कटारियांवर हल्‍ला झाला याची चौकशी एलसीबीचे पोलिस अधिकारी करत आहेत.

Back to top button