Leopard death : कराडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार | पुढारी

Leopard death : कराडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

कराड, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गावर कराडलगत वाठार येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार (Leopard death) झाला. रविवार दिनांक 26 रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवले. तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याने नंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने बिबट्याचे दहन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार दि. 26 रोजी सकाळी 5.30 वाजता वनक्षेत्रपाल बामणोली बाळकृष्ण हसबनिस यांना त्यांच्या सहकारी यांचा फोन आला. त्यांनी महामार्गावर कराड तालुक्यातील वाठारजवळ असलेल्या पुलाजवळ बिबट्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असल्याचे सांगितले. त्यानंतर वनक्षेत्रपाल हसबनिस यांनी तात्काळ कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना फोन करून याची माहिती दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार नवले व त्यांचे सहकारी यांनी त्वरित घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथे पाहणी केली असता त्यांना बिबट्या मृत (Leopard death) अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील पशुसंवर्धन दवाखान्यात आणला. तेथे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.

बिबट्या हा पूर्ण वाढ झालेला नर आहे. त्याचे वजन साधारण 45 किलो असून वय अंदाजे 4.5 ते 5 वर्ष असावे असे सांगितले जात आहे. अपघातामध्ये बिबट्याच्या डाव्या बाजूच्या शरीरावरील कंबरेवर जोरात धडक बसल्याने मोठ्या प्रमाणावर अंर्तगत रक्तस्त्राव झाले असल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट झाले आहे. बिबट्याचे सर्व अवयव, मिश्या, सर्व नखे , सर्व दात हे सुस्थितीत असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सावखंडे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक अरुण सोळंकी, रमेश जाधवर, अश्विन पाटील तसेच वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत बिबट्याचे दहन करण्यात आले. रात्रीच्या वेळी बिबट्या महामार्गावर आल्यानंतर नेमकी कोणत्या वाहनाने बिबट्याला धडक दिली याचा शोध घेतला जात आहे.

पहा व्हिडिओ : दिल्लीची प्रसिद्ध जामा मस्जीद नेमकी आहे कशी? 

Back to top button