महिलांनो, गैरफायदा घेणार्‍यांना हिसका दाखवा : मुख्यमंत्री ठाकरे | पुढारी

महिलांनो, गैरफायदा घेणार्‍यांना हिसका दाखवा : मुख्यमंत्री ठाकरे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : महिलांनो, गैरफायदा घेणार्‍यांना हिसका दाखवा असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, समाजातील प्रत्येक महिला सुरक्षित राहिली पाहिजे. त्यासाठी तिने खंबीर असणे गरजेचे असून जिथे भगिनींना त्रास होईल तिथे त्यांनी गैरफायदा घेणार्‍यांंना हिसका दाखवला पाहिजे. आज कोरोना, कोरोना जप सुरु असताना सातारा जिल्हा पोलिस दलाने ‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प’ राबवण्यास सुरुवात केल्याने त्यांचे कौतुक असून यामध्ये नक्‍की यश मिळेल, अशा सदिच्छा मुख्यमंत्री ठाकरे या प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी दिल्या.

‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे’ उद्घाटन ऑनलाईन प्रणालीद्वारे सातारा पोलिस करमणूक केंद्रात झाल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सातार्‍यातील व्यासपीठावर गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते. दरम्यान, ऑनलाईन प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पोलिस महासंचालक संजय पांडे, गृह विभाग मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विशेष पोलिस महासंचालक राज वर्धन यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले होेते.

मुख्यमंत्री म्हणाले, महिलांवरील अत्याचाराचे स्वरुप बदलले आहे. सोशल मीडियावर देखील महिलांची गळचेपी होत आहे. महिला, युवती यांनी गैरफायदा घेणार्‍या प्रवृत्तींना जागीच हिसका दाखवावा. सातारा पोलिसांनी महिला सुरक्षिततेसाठी सर्वसमावेशक व व्यापक असा पायलट प्रोजेक्ट केल्याने तो निश्‍चित महत्वपूर्ण आहे. सातारा पोलिसांनी याचा दोन महिन्यांचा अहवाल दिल्यानंतर पुढे राज्यात तो लागू करण्याबाबत ठरवला जाईल.

पोलिसांवर ताणतणाव आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना कोरोनासारखी महामारी आल्यानंतरही त्यामध्ये न डगमगता ते सैनिकांप्रमाणेच लढले. यातही सातारा पोलिसांनी कौतुकास्पद व समाजोपयोगी प्रकल्प राबवल्याने पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रास्तविक गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले. सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी ‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे’ संगणकीय सादरीकरण करुन त्याच्या कार्यपध्दतीची माहिती दिली.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, महिला सुरक्षिततेला प्राधान्य देत कम्युनिटी पोलिसिंग प्रभावीपणे केली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यात दोन महिन्यांपासून यावर प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे. निश्‍चितपणे महिलांना हा प्रकल्प उपयुक्‍त ठरणार आहे. महिला, युवतींनी नि:संकोचपणे अडचणी मांडाव्यात. हा प्रकल्प समजून घेवून त्याची जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तहसीलदार आशा होळकर, अभिनेत्री अश्‍विनी महांगडे, पोलिस अधिकारी, सातारा जिल्हा पोलिस क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षित ज्युदो, तायक्‍वांदोचे पोलिस व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Back to top button