

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : kdcc bank election : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मागील चार दिवसांत फक्त तीन उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकही अर्ज माघार आला नाही. पुढील आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच भाजप आघाडीच्या नेत्यांच्या बैठकी होत आहेत.
यानंतरच माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. इच्छुकांचे नेत्यांच्या हालचालीवर लक्ष असून 20 आणि 21 डिसेंबर शेवटच्या दोन दिवसांतच माघारीसाठी झुंबड उडणार आहे.
जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदांसाठी 275 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 226 उमेदवार रिंगणात होते. मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवसांत फक्त तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे.
पहिल्या दिवशीच दोघांनी माघार घेतल्याने गगनबावड्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर चंदगड तालुक्यातून एकाने माघार घेतली होती. माघारीकडे इच्चुकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
दरम्यान, 16 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ मुलाखत घेणार आहेत. तर दुसर्या दिवशी 17 डिसेंबरला पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील मुलाखती घेणार आहेत.
त्याच दिवशी रात्री सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. तत्पूर्वी, शिवसेना आणि भाजप आघाडीच्या स्वतंत्रपणे बैठका होणार आहेत. यानंतरच उमेदवारांच्या माघारीला गती येणार आहे.