सातारा जिल्हा उद्यापासून ‘अनलॉक’ची शक्यता | पुढारी

सातारा जिल्हा उद्यापासून ‘अनलॉक’ची शक्यता

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा उद्यापासून ‘अनलॉक’ची शक्यता आहे. आरटी-पीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा कमी आल्याने सातारा जिल्ह्याचा पुन्हा तिसर्‍या स्तरामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेली आवश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना पुन्हा सुरू होणार आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांची शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात बैठक बोलावली आहे.

विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, यावेळी अनलॉकसंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार सध्या लॉक-अनलॉक प्रक्रिया राबवली जात आहे.

आरटी-पीसीआर चाचणी अहवालांमधील कोरोना पॉझिटिव्हिटीचा विचार करून लॉकडाऊन शिथिल करणे किंवा वाढवणे यासंदर्भात निर्णय घेतले जात आहेत. शुक्रवार ते गुरुवार या 7 दिवसांचा पॉझिटिव्हिटी दर मोजला जातो.

त्यावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीमध्ये चर्चा करून प्रत्येक शुक्रवारी जिल्हाधिकारी पुढील सात दिवसांसाठी आदेश काढतात. त्याची अंमलबजावणी शनिवार ते शुक्रवार केली जाते. शासनाने घालून दिलेल्या या नियमांचे पालन जिल्हा प्रशासन करत आहे. सध्या जिल्ह्यात प्रशासनाने टेस्टिंग वाढवले आहे. जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात आला आहे.

त्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना गावे विभागून देण्यात आली आहेत. जिल्ह्यात दिवसाला 15 हजाराहून

अधिक लोकांच्या कोरोना

चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे आरटी-पीसीआर चाचण्यांचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर जवळपास निम्म्यावर घसरला आहे. जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांचा पॉझिटीव्हीटी रेट 7.17 टक्के आहे. मागील दोन दिवसांचा विचार करता गुरुवारी एका दिवसाची ही पॉझिटीव्ही 6.10 टक्केच्या आजसपास राहिली तर जिल्ह्याचा एकूण पॉझिटीव्हीटी रेट 7.02 टक्के इतकी कमी येवू शकते. जिल्हा प्रशासनाच्या या आकडेवरुन कोरोना संसर्ग कमी झाल्याचे स्पष्ट आहे.

त्यावरुन जिल्ह्याचा पुन्हा तिसर्‍या स्तरात समावेश होणार आहे.

तसे झाले तर आवश्यक दुकाने व आस्थापना सुरु होवू शकतात.

अत्यावश्यक सेवांवरील असलेले निर्बंध कमी होवून वेळेची मुभा आणखी वाढवून मिळू शकते.

जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा जिल्ह्याचा तिसर्‍या टप्प्यात समावेश होण्याची आशा आहे.

गेली पंधरा दिवस जिल्हा चौथ्या स्तरात असल्यामुळे व्यवसायिकांमध्ये अस्वस्थता असून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच अनलॉकसंदर्भात भूमिका स्पष्ट केली असून तसे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील आमदार-खासदारांची बैठक बोलावली आहे.

या बैठकीस विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर प्रमुख उपस्थित राहणार आहे.

या बैठकीत कोरोना संदर्भातील अहवाल सादर केले जाणार असून अनलॉकबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत.

Back to top button