कोयना धरण परिसरात गतवर्षी इतकाच सरासरी पाऊस | पुढारी

कोयना धरण परिसरात गतवर्षी इतकाच सरासरी पाऊस

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : कोयना धरण परिसरात गतवर्षी इतकाच सरासरी पाऊस यावर्षीही झाला आहे. मात्र, असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत 2.84 टीएमसी जादा पाणीसाठा धरणात आहे. सद्यस्थितीतील पाणीसाठा समाधानकारक वाटत असला तरी जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात दमदार पावसाची गरज आहे. कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे.

धरणात गुरुवार सायंकाळपर्यत 46.61 टीएमसी इतके पाणी होते. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही जवळपास 59 टीएमसी पाण्याची गरज असून त्यासाठी आगामी काळात सरासरी साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पावसाची गरज आहे.

गेल्या काही वर्षातील तुलनात्मक सरासरी पावसाचा विचार करता यावर्षी अद्यापही त्या तुलनेत पाऊस झालेला नाही.

गतवर्षी टप्प्याटप्प्याने झालेला पाऊस व निसर्गाची मिळालेली साथ यामुळे कोयनेची तांत्रिक स्थिती मजबूत राहिली होती.

त्यामुळे गेल्यावर्षी महापुराचा धोका कमी झाला होता आणि ही एक जमेची बाजू ठरली होती.

धरणातील एकूण पाण्यापैकी 67.50 टीएमसी पाणी पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी वापरले जाते. तर सरासरी 36 टीएमसी पाणी हे सिंचनासाठी वापरण्यात येते.

एक जूनपासून सुरू झालेल्या या तांत्रिक वर्षातील आत्तापर्यंतच्या दीड महिन्यात पश्चिमकडे वीज निर्मितीसाठी 7.60 टीएमसी पाणी वापर झाला आहे.

तर सिंचनासाठी अवघा 0.40 टीएमसी पाणीवापर झाला आहे.

तर गतवर्षीचा विचार करता धरणात तुलनात्मक 2.84 टीएमसी ज्यादा पाणी असून 7.261 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती झाली आहे.

महाबळेश्वरमध्ये यावर्षी 1 हजार 609 मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षीपेक्षा 131 मिलीमीटर जादा पाऊस झाला आहे.

नवजा येथे केवळ 15 मिलीमीटर पाऊस झाला असून आजवर 1 हजार 526 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तर कोयनानगरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 265 मिलीमीटर कमी पाऊस झाला आहे. यंदा 1 हजार 175 मिलीमीटर पावसाची नोंद कोयनानगरमध्ये झाली आहे.

कोयनेत हलक्या स्वरूपाचा पाऊस

गुरुवारी सायंकाळी कोयना धरणात प्रतिसेकंद 16 हजार 861 क्युसेक्स पाण्याची आवक होत होती. धरणातील पाणीसाठा 46.61 इतका झाला आहे. बुधवार सायंकाळ 5 वाजल्यापासून गुरुवार सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांत धरणात 1.53 टीएमसी पाणी वाढले आहे. कोयनानगरमध्ये 26 मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे 62 मिलिमीटर तर महाबळेश्वरमध्ये 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच कोयना धरण पाणलोट क्षेत्र अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेतच आहे.

Back to top button