मी राजकीय संन्यास घेणार नाही : खा. उदयनराजे भोसले | पुढारी

मी राजकीय संन्यास घेणार नाही : खा. उदयनराजे भोसले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : महायुतीमध्ये घटक पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. जागा वाटपाचे चित्र लवकरच स्पष्ट होणार असून उमेदवारीबाबत वेळ आल्यावर बघू. पण मी राजकीय संन्यास घेणार नाही, अशी भूमिका खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मांडत लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.

प्रसारमाध्यमांनी निवडणुकीच्या अनुषंगाने खा. उदयनराजेंशी संवाद साधला. तिकीट वाटपाचा घोळ सुरू असून भाजपच्या लोकसभा उमेदवार यादीत तुमचे नाव नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत, याबाबत विचारले असता खा. उदयनराजे भोसले म्हणाले, माझ्याकडे एरोप्लेन, ट्रेन, पिक्चर, बसचे तिकीट आहे. बाकीच्या तिकिटाचे माहीत नाही. पण उमेदवारीबाबत त्यावेळचे त्यावेळी बघू, असे त्यांनी सांगितले.

तुम्हाला भाजपकडून निवडणुकीचे तिकीट मिळेल की नाही? तुमचा निर्णय काय असेल? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, निवडणूक तिकिटाबद्दल आताच बोलणे उचित ठरणार नाही. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र आले आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना महायुती म्हणून सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांचाही विचार करावा लागेल. तिकीट वाटपात घटक पक्षांचे प्रमुख ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांना जागा मिळाव्यात असे वाटते. यात काय चुकीचे नाही. जागा वाटपाचे ठरेल त्यावेळी बघू. पण मी काय संन्यास घेणार नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. यावेळी सातारा विकास आघाडीचे प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, जि. प. चे माजी सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अ‍ॅड. विनीत पाटील उपस्थित होते.
दरम्यान, खा. उदयनराजे समर्थकांमध्ये आजही खा. उदयनराजेंच्या उमेदवारीवरून अस्वस्थता जाणवत होती. मराठा संघटनाही त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असून आगामी काळातील रणनिती काय असावी यासाठी बैठकांचे नियोजन करण्यात आज व्यस्त होत्या.

Back to top button