पाणी योजनांद्वारे दुष्काळी भागाला न्याय देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

पाणी योजनांद्वारे दुष्काळी भागाला न्याय देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
Published on
Updated on

खटाव; पुढारी वृत्तसेवा : पूर्वीचे राज्यकर्ते पाण्यासाठी दुष्काळी जनतेला फक्त आश्वासनांवर अनेक वर्षे झुलवत ठेवायचे. ते प्रत्येक निवडणुका प्रलंबित पाणी प्रश्नावर लढायचे. आम्ही मात्र, निवडणुकीसाठी जनतेला फक्तआश्वासने देत नाही तर तत्काळ निधी देऊन दुष्काळी भागाच्या पाणीयोजना पूर्ण करून जनतेचे आशीर्वाद मागतो. जिहेकठापूर, उरमोडी, तारळी, टेंभू, म्हैसाळ अशा सर्व पाणीयोजना पूर्णत्वाला नेऊन पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, पाणी योजनांसाठी यशस्वी पाठपुरावा करणार्‍या आ. जयकुमार गोरे यांच्या कुशल नेतृत्वामुळेच दुष्काळी जनतेची स्वप्नपूर्ती होत असल्याचे गौरवोद्गारही ना. फडणवीस यांनी काढले.

माणमधील आंधळी धरण येथे गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ना. महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, माजी आमदार दिलीप येळगावकर, मदन भोसले, मनोहर भिडे, मनोज घोरपडे, मकरंद देशपांडे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी दीपक कपूर, अतुल कपोले, हणमंत गुणाले, अरुण नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भगवानराव गोरे, अंकुश गोरे, सोनिया गोरे, सुरभि भोसले, अरुण गोरे, अर्जून काळे, शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, गणेश सत्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माण आणि खटावची जी भूमी वर्षानुवर्षे थेंब थेंब पाण्यासाठी तरसली होती त्या भूमीत आज प्रत्यक्ष पाणी आले आहे. आ. जयकुमार गोरे आणि इथल्या जनतेसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. जयाभाऊंनी या पाण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. गेल्या 15 वर्षात ते विधानसभेत आल्यापासून फक्त या भागाच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी लढत आहेत. सुरुवातीला त्यांच्यामुळेच मला जिहेकठापूर, उरमोडीसारख्या योजना माहित झाल्या. सुरुवातीच्या काळात या योजनांना निधी मिळाला नाही. मात्र, मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जनतेला मदत करायचे ठरवले होते.

 आम्ही या भागातील अनेक योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता आणि लागेल तितका निधी देवून वेगाने कामे सुरु केली. माण आणि खटावच्या पाणी योजनांसाठी आ. जयाभाऊंनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना चांगले यशही आले आहे. जिहे कठापूर योजनेला केंद्राचेही पैसे मिळाले आहेत. प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होताना जनतेला प्राण देणारे जिहे कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आले आहे. आता या भागातील शेतकर्‍यांचे कल्याण होणार आहे. 3.17 टीएमसी पाण्याचा वापर होणार्‍या या योजनेच्या उत्तर माणमधील उरलेल्या गावांसाठीही निधी देणार आहे.

दीड वर्षात आम्ही 121 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा दिली आहे. त्यामुळे 15 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सातारा, सांगली, सोलापूरच्या दुष्काळी भागाची आम्ही सेवा करत आहोत. उघड्या कॅनॉलमधून पाणी देण्यापेक्षा बंद पाईपलाईनने पाणी देणे सुरु केल्याने आठ टीएमसी पाण्याचे फेरवाटप करता आले आहे. यावेळी ना. राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले, जशी देशाची गॅरंटी पंतप्रधान मोदींनी घेतली आहे तशी आ. जयकुमार गोरेंची गॅरंटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. आ. गोरेंनी मागणी केलेल्या पाणी योजनांच्या प्रत्येक कामाला लागेल तितका निधी मिळत आहे. जिहेकठापूरचे पाणी आंधळी धरणात आल्याने आ. गोरेंचे 15 वर्षांपूर्वीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.

खा. रणजित ना. निंबाळकर म्हणाले, आज खटाव माणसाठी सोनियाचा दिवस आहे. आंधळी धरणात आलेले पाणी म्हणजे आ. गोरेंनी 15 वर्षे केलेल्या संघर्षाचे फळ आहे. आमच्या सरकारच्या कामाच्या झपाट्यामुळे माण, खटाव, फलटण, माळशिरसह सर्वच तालुक्यांचा पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आला असल्याचे ते म्हणाले.

जयाभाऊ, रणजितसिंहांची स्पीडबोटीतून धमाकेदार एंट्री

जिहे कठापूर योजनेच्या जलपूजन कार्यक्रमासाठी पाण्यात दीडशे फुटांचा रॅम्प बनवण्यात आला होता. सभेचा भव्य मंडपही धरणाकडेलाच उभारण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वी आ. जयकुमार गोरे आणि खा. रणजित निंबाळकर यांची स्पीडबोटीतून येऊन व्यासपीठावर धमाकेदार एंट्री झाली. ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

…अन् उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. जयाभाऊंना बांधला चांदीचा फेटा…

दहा वर्षांपूर्वी उरमोडीचे पाणी किरकसालच्या बोगद्यातून माण तालुक्यात आणल्यावर जनतेने आ. गोरेंना मानाचा फेटा बांधला होता. त्याच व्यासपीठावर सन्मानाने फेटा उतरवून आ. गोरेंनी जिहे-कठापूरचे पाणी माण तालुक्यात आणल्यावर पुन्हा फेटा बांधेन असा पण केला होता. आज दहा वर्षांनी हा पण पूर्ण झाल्यानंतर बिदालकर ग्रामस्थांनी आणलेला चांदीचा फेटा ना. फडणवीस यांनी आ. जयाभाऊंना बांधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news