

परळी : सोमनाथ राऊत, घाटाई देवीच्या यात्रेत जायचं, मनसोक्त फिरायचं, आनंद घ्यायचा आणि रात्रीच परत यायचं असं ठरवून दहिवड येथील कातकरी समाजातील तीन मुली घाटाईला गेल्या. मात्र, घडलं वेगळंच, मुलींनी घाटाईचे दर्शन घेतले, मनसोक्त फिरल्या. यात्रेचा मनमुराद आनंदही लुटला. यानंतर घरी जाण्यासाठी आलवडी एस. टी बस पकडायची सोडून अलिबागची बस पकडल्याने आलवडीच्या ऐवजी या मुली अलिबागला जाऊन पोहोचल्या. मात्र, तेथील शिक्षकाच्या तत्परतेमुळे ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर मुलींना पुन्हा सुखरूप आलवडीला सोडण्यात आले. (Satara)
दि. २९ रोजी घाटाई देवीची यात्रा होती. या यात्रेला दहिवड येथील कातकरी समाजातील सविता वाघे, प्रियांका वाघे व पूजा निकम या १६ ते १८ वयोगटाच्या मुली रात्री उशिरापर्यंत यात्रेत रमल्या होत्या. यानंतर त्यांनी रात्री उशिरा घरी जाण्यासाठी घाटाई देवी येथून सातारा एसटी पकडली. सातारा बसस्थानक येथे उतरल्यानंतर त्यांनी आलवडीला जाणारी एसटी शोधली. त्याच वेळेला काही महिलांनी त्यांना एक एस.टी दाखवली. त्या तत्काळ त्या एसटीत चढल्या. त्यावेळी त्यांना ही गाडी आलवडीला जाते की अलिबागला? याची काहीच कल्पना नव्हती. त्या थंडीत तशाच गाडीत बसून राहिल्या, यामध्ये त्यांनी एसटीचे तिकीटही काढले नव्हते. त्या थंडीत तशाच झोपूनही गेल्या.
पहाटे लवकर एसटी अलिबाग बस स्थानकावर पोहोचल्यावर त्या गाडीतून उतरल्या. यानंतर त्यांना आपण भलत्याच ठिकाणी पोहोचल्याचे समजले. थोडा वेळ तशाच त्या बसस्थानकावर थांबून राहिल्या. काही वेळाने तिथे त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना एका महिलेने सहानगोठी आदिवासी वाडी या ठिकाणी एका पिकअप गाडीत बसवून त्या आदिवासी पाड्यात पाठवले. तिथे गेल्यावर त्यांनी एका घरात आश्रय घेतला. जेथे आश्रय घेतला त्यांनी त्यांना जेवण दिले. तसेच त्यांना या मुली आपल्याच समाजातील असल्याचे समजून आले. मात्र, चुकून या इकडे आल्याचेही संबंधित लोकांच्या लक्षात आले. ही गोष्ट त्या आदिवासी पाड्यातील लोकांनी तेथील शिक्षक संजय कोळीकर व विजय तुणतुने यांना सांगितली. या दोन्ही शिक्षकांनी साताऱ्यातील सह्याद्रीनगर येथील शिक्षक सूर्यकांत पवार यांना सांगितली. पवार यांनी ही बाब बबन देवरे यांना कळवली. देवरे यांनी मुलींच्या कुटुंबीयांना याची खबर दिली. तसेच मुलींचा कुटुंबीयांशी संपर्क साधून दिला. त्यांनतर कुटुंबीयांना धीर आला.
हेही वाचा