कुणबी व मराठा आरक्षण विषय वेगवेगळा : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

कुणबी व मराठा आरक्षण विषय वेगवेगळा : मुख्यमंत्री शिंदे

प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा : कुणबी आरक्षणाचा विषय वेगळा आहे आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचा विषय वेगळा आहे. याबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नये. मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला तो कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्रं मिळत नव्हती त्यांच्यासाठी आहे. इतरांच्या हक्काला बाधा न पोहोचता आम्हाला आरक्षण मिळावं, ही जरांगे पाटील यांची मागणी होती. अधिसूचनेत या सर्व बाबी स्पष्ट नमूद केल्या आहेत. ही अधिसूचना इतर समाजालाही मार्गदर्शक ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा निर्णय होण्यासाठी मागासवर्ग आयोग नेमला असून त्याचे काम सुरू आहे. आयोग एम्पीरिकल डाटा गोळा करत आहे. 36 जिल्ह्यांत हे काम सुरू आहे. मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटामधून बाहेर येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं होतं त्यात त्रुटी राहिल्या होत्या. त्याबाबतचा अहवाल तयार केला जात आहे. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणारं आरक्षण राज्य सरकार देणार आहे. यावेळी इतर कोणावर अन्याय होणार नाही, असेही ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाने अनेकांना संधी दिली, मोठं केलं. मात्र, त्यांनी संधीचे सोनं केलं नाही. त्यावेळी मराठा समाजाला वंचित ठेवले. सर्व्हेक्षणाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, कोणत्या ना कोणत्या कारणाने यात अडथळा आणायचे काम विरोधक करताहेत, हीच त्यांची खरी प्रवृत्ती आहे. सर्व पक्षांनी सर्व्हेक्षणाला सहकार्य करावे, असेही ना. शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले प्रतापगडला भेट देऊन कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची महाआरती केली. किल्ल्यावरील छ. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले. प्रतापगडावरील कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ महादेव घुले, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, प्रांत राजेंद्र जाधव, तहसीलदार तेजस्वीनी पाटील, कार्यकारी अभियंता सोनावणे आदी उपस्थित होते.

किल्ले प्रतापगड ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. किल्ल्यावर सुरू असलेल्या देखभाल दुरुस्ती कामाची पाहणी ना. शिंदे यांनी केली. 130 कोटीचा आराखडा तयार केल्याचे त्यांनी सांगितले. प्रतापगड ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी वाढीव वाहनतळ रस्ता रुंदीकरण तसेच पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त विहीरीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भुजबळ आमचे सहकारी; गैरसमज दूर होईल

छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत, त्यांनी या अधिसूचनेबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार आहे. नारायण राणेंनी केलेल्या विरोधाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही अधिसूचना जुन्या कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी आहे.

Back to top button