काळूबाईच्या गजराने मांढरगड दुमदुमला | पुढारी

काळूबाईच्या गजराने मांढरगड दुमदुमला

मांढरदेव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळुबाई देवीच्या दर्शनाला यात्रेच्या मुख्य दिवशी गुरुवारी लाखो भाविकांनी हजेरी लावली. काळुबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली. ‘आई काळूबाईच्या नावाने चांगभल’च्या गजरात भाविकांनी मांढरगड परिसर दणाणून सोडला.

शाकंभरी पौर्णिमेदिवशी गुरुवारी मांढरदेेव यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी 6 वा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा मुख्य प्रशासक मांढरदेव देवस्थान न्या. व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते सपत्नीक देवीची आरती व महापूजा झाली. यावेळी वाईचे सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, तहसीलदार सोनाली मेटकरी, विश्वस्त चंद्रकांत मांढरे, सुनील मांढरे, विजय मांढरे, सुधाकर गुरव, ओंकार गुरव तसेच विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शाकंभरी पौर्णिमा असल्याने बुधवारी रात्रीपासूनच भाविक मांढरदेव येथे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. भाविक एसटी बस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, दुचाकी इतर खासगी वाहनांनी मांढरदेव येथे दाखल झाले. बुधवारी रात्री देवीची मानाची पालखी वाजत गाजत काळुबाई मंदिरामध्ये आणण्यात आल्यानंतर देवीचा जागर झाला. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे म्हणून देवस्थान ट्रस्टने कळस दर्शन रांग, देव्हारा रांग व चरण दर्शन रांगा अशा वेगवेगळ्या दर्शन रांगांचे बॅरिगेट्स उभारल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ होत होते. गुरुवारी सकाळी 6 वा पुजेचा मान असलेल्या दाम्पत्याचा देवस्थानच्यावतीने साडी चोळी व देवीचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.

धुके व थंडी असल्याने सकाळी गर्दीचा ओघ मध्यम स्वरूपाचा होता. दुपारी बारानंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दुपारी एकनंतर गर्दीचा ओघ आणखी वाढला. मात्र दर्शनासाठी जाण्याचा व माघारी परतण्याचा मार्ग वेगवेगळा असल्याने गर्दी थांबून राहत नव्हती, दर्शन रांगेतील भाविकाला साधारणत 2 ते 3 तासांमध्ये सुलभ दर्शन होत होते. देव्हारा दर्शन रांग व कळस दर्शन रांगेतील भाविकांची संख्याही मोठी होती. देवीचे दर्शन झाल्यानंतर भाविक सुखावत होता. दर्शन घेऊन बाहेर आलेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्ट वतीने बुंदी लाडू प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.

यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मोठा फौजपाटा मांढरदेव येथे तैनात होता. त्याचबरोबर भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय विभागाची पथके काळूबाई मंदिर, ग्रामपंचायत व उतरणीच्या मार्गावर कार्यरत आहेत. यात्रेत पशुहत्या होऊ नये म्हणून पोलीस व प्रशासन दक्ष आहेत. यासाठी वाई मांढरदेव व भोर मांढरदेव या रस्त्यांवर जागोजागी ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात होती.

देवस्थान ट्रस्टकडून नेटके नियोजन….

यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टने काटेकोर नियोजन केले आहे. आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने प्रशासनातील कर्मचार्‍यांच्या भोजनाची व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. या यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आल्यामुळे भाविकांनीही समाधान व्यक्त केले.

Back to top button