सातारा : मांढरगड दुमदुमणार; यात्रेचा आज मुख्य दिवस | पुढारी

सातारा : मांढरगड दुमदुमणार; यात्रेचा आज मुख्य दिवस

मांढरदेव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळुबाई देवीची यात्रा सुरू झाली असून गुरुवार, दि. 25 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे दाखल होऊ लागले असून ही यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अलर्ट झाले आहे.

मांढरदेव यात्रेची महती महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांतही पसरली आहे. दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. 2005 मध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या कटू आठवणी विसरून भाविक मांढरदेव यात्रेसाठी हजेरी लावताना दिसत आहेत. यंदा दि. 25 जानेवारी हा दिवस मांढरदेव गडावरील श्री काळूबाई देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस असून पौष पोर्णिमेला देवीची वार्षिक यात्रा भरत आहे. पूर्वसंध्येला म्हणजे बुधवार दि.24 रोजी देवीची पालखीतून मिरवणूक काढून देवालयाच्या परिसरात देवीचा जागर करण्यात आला. गुरुवार दि. 25 रोजी शाकंभरी-पौष पौर्णिमा असून पहाटे 6 वा. मुख्य शासकीय पूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा मुख्य प्रशासक मांढरदेव देवस्थान न्या. व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.

यावेळी वाईचे सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, तहसीलदार सोनाली मेटकरी, विश्वस्त चंद्रकांत मांढरे, सुनील मांढरे, विजय मांढरे, सुधाकर गुरव, ओंकार गुरव यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर दिवसभर देवीचे दर्शन भाविकांना घेता येईल. शुक्रवार दि. 26 रोजी उत्तर यात्रा होणार असून त्या दिवशी मुख्य यात्रेची समाप्ती होणार आहे. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने मांढरगडावर पोहोचू लागले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळावा, यात्रा काळात परिसर स्वच्छ ठेवावा, ठरवून दिलेल्या वाहनतळावरच वाहने पार्किंग करून वाहतुकीची कोंडी टाळावी, रांगेत जावून दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासन व देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना करण्यात आले आहे.

पोलीस अधिकार्‍यांसह 600 जणाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी दोन. पोलीस निरीक्षक पाच, सहाय्यक पोलीस निरीक्षक सहा, पोलीस कर्मचारी 250, होमगार्ड 150, कमांडोज 150 असा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. काही खाजगी सामाजिक संस्था भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

मांढरगडावर पशुहत्येस मनाई…

मांढरगडावर विश्वस्त मंडळाने भाविकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी काही ठोस निर्णय घेतले आहेत. यात्रेदरम्यान या परिसरात पशुहत्येस मनाई करण्यात आली असून, भाविकांना कोंबड्या, बकरी, बोकड कापता येणार नाहीत. भाविकांतर्फे अंधश्रद्धेतून करण्यात येणार्‍या अनिष्ट रूढी व परंपरा बंद करण्यात आल्या आहेत. झाडांवर खिळे ठोकणे, लिंबे टाकणे, काळ्या बाहुल्या बांधणे आदी प्रकार बंद करण्यात आले आहेत. तसेच नारळ न फोडता ते अर्पण करण्याची सोय करण्यात आली आहे.

Back to top button