Satara District Bank : जिल्हा बँकेसाठी 96.33 टक्के मतदान | पुढारी

Satara District Bank : जिल्हा बँकेसाठी 96.33 टक्के मतदान

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank) पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी 10 जागांसाठी 11 मतदान केंद्रांवर चुरशीने 96.33 टक्के मतदान झाले. त्यामुळे 20 उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले. जावलीत मेढा केंद्रावर आ. शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांच्या गटात हमरीतुमरी झाली.

कराड सोसायटी मतदार संघात पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, पाटणमध्ये गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जावलीत आ. शशिकांत शिंदे यांनाही तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागले. माणमध्ये मतदानाचा टक्का वाढला असून तो कोणाला धक्का देणार, याची उत्कंठा आहे. खटाव सोसायटीतही चुरशीने मतदान झाले असून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, मंगळवारी मतमोजणी होणार असून विजयासाठी उमेदवारांनी देव पाण्यात घातले आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा बसल्यानंतर रविवारी 10 जागांसाठी सर्वच तालुक्यात चुरशीने मतदान झाले. यामुळे आता 20 उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले असून कोणाच्या गळ्यात हार पडणार? व कोणाचे चेहरे हिरमुसणार? हे आता मंगळवारीच समजणार आहे. (Satara District Bank)

मतदानास प्रारंभ झाल्यानंतर सकाळी सकाळीच मतदारांच्या केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्ह्यात 83 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर गर्दी कमी झाली होती. सायंकाळी 4 नंतर पुन्हा थोड्या फार प्रमाणात आलेल्या मतदारांनी आपला हक्क बजावला. यावेळी पावसाने अडथळा आल्याने काही काळ मतदान प्रक्रिया संथ झाली होती.

मतदान सुरू होण्यापूर्वीच अनेक तालुक्यांमध्ये उमेदवार व त्यांच्या पदाधिकार्‍यांनी बुथ मांडले होते. या बुथवरूनच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींकडून मतदारांना फोनाफोनी सुरू होती. जावली, कोरेगाव, कराड व खटाव सोसायटी मतदारसंघात अज्ञातस्थळी नेलेले मतदार पोलिस बंदोबस्तामध्ये मतदान केंद्रावर आणण्यात आले. दिवसभरात कधी एकगठ्ठा तर कधी एक-दोन अशी मते नोंदवली जात होती. दुपारनंतर पावसाची रिमझिम झाल्यानंतर बुथवरील कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. तसेच पावसामुळे ही मतदान प्रक्रिया थोडी संथ झाली होती. (Satara District Bank)

11 मतदान केंद्रावर दिवसभरात शांततेत मतदान झाले. 1964 मतदारांपैकी सुमारे 72 मतदार वंचित राहिल्याने 1892 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोसायटी मतदारसंघासाठी 99.46 टक्के, नागरी सहकारी बँका व पतसंस्था मतदारसंघात 96.25 टक्के, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात 96.33 टक्के, महिला प्रतिनिधी मतदारसंघात 96.33 टक्के असे मतदान झाले.

सोसायटी मतदारसंघातून कराड तालुक्यात 140 पैकी 140, पाटण 103 पैकी 102, कोरेगाव 90 पैकी 90, जावली 49 पैकी 49, माण 74 पैकी 72, खटाव 103 पैकी 103 जणांनी मतदान केले.

नागरी सहकारी बँका व पतसंस्था मतदारसंघात सातारा तालुक्यात 92 पैकी 85, जावली 7 पैकी 7, कराड तालुक्यात 69 पैकी 67, महाबळेश्वर तालुक्यात 14 पैकी 14, पाटण तालुक्यात 29 पैकी 29, कोरेगाव तालुक्यात 20 पैकी 19, खटाव तालुक्यात 18 पैकी 18, माण तालुक्यात 24 पैकी 23, खंडाळा तालुक्यात 15 पैकी 15, वाई तालुक्यात 31 पैकी 29, फलटण तालुक्यात 55 पैकी 54 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

इतर मागास प्रवर्ग आणि महिला राखीव मतदारसंघात सातारा तालुक्यात 416 पैकी 397, जावली 69 पैकी 69, कराड तालुक्यात 332 पैकी 325, महाबळेश्वर तालुक्यात 48 पैकी 44, पाटण तालुक्यात 203 पैकी 197, कोरेगाव तालुक्यात 131 पैकी 126, खटाव तालुक्यात 150 पैकी 150, माण तालुक्यात 119 पैकी 110, खंडाळा तालुक्यात 88 पैकी 87, वाई तालुक्यात 132 पैकी 123, फलटण तालुक्यात 276 पैकी 264 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

संपूर्ण जिल्ह्यात केवळ जावली तालुक्यात आ. शिवेंद्रराजे व आ. शशिकांत शिंदे यांच्या गटात हमरीतुमरी झाली. वसंतराव मानकुमरे व ऋषिकांत शिंदे यांच्यात मतदान केंद्रावरच वादावादी झाली. मात्र, आ. शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांनी हा वाद मिटवला. त्यानंतर मतदान शांततेत झाले.

Back to top button