मोखाडा – जव्हार येथे डांबून ठेवलेल्या 12 मजुरांसह 13 बालकांची सातार्‍यातून सुटका | पुढारी

मोखाडा - जव्हार येथे डांबून ठेवलेल्या 12 मजुरांसह 13 बालकांची सातार्‍यातून सुटका

खोडाळा ः पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर प्रचंड वायरल व्हिडीओने खळबळ माजवली होती. कृष्णा नडगे रा. डबकपाडा (जव्हार) यांचा एक व्हिडिओ ज्यात पालघर जिल्ह्यातील मोखाडा व जव्हार तालुक्यातील मजूरांना बळजबरीने डांबून त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे, 14 पैकी 4 कुटुंब पळून गेल्याने कृष्णा याला मारहाण केल्याचेही त्याने व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे. या व्हिडीओची तात्काळ दखल घेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेचे एक पथक सातारा येथे पाठवत या 12 मजुरांसह 13 बालकांची सुटका करून घेतली आहे. याबाबत सबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सातार्‍यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात सुरू आहे.

संबंधित बातम्या

जव्हार येथील कृष्णा नडगे यांच्या समवेत इतर मजूर सातारा येथील कोरेगाव येथील ठेकेदार तेजेश यादव आणि नामदेव खरात यांच्याकडे ऊसतोडीच्या कामावर गेले होते. यातील चार कुटुंब मालकाच्या जाचाला कंटाळून निघून आली, यानंतर संतप्त होऊन मालकाने कृष्णा आणि इतरांना मारहाण केली . सहा दिवस त्यांना डांबून ठेवून त्यांच्या छळ केला. कृष्णा याने शेतावर कामावर आल्यावर मोबाईल मध्ये एक व्हिडिओ बनवत आपल्यावर अत्याचार होत असल्याची व्यथा मांडली आणि मदतीचे आवाहन केले होते.

गरीब मजुरांच्या न्याय्यहक्कासाठी मदतीला धावणार्‍या श्रमजीवी संघटनेने या व्हिडीओची दखल घेतली. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी आढावा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी तातडीने श्रमजीवी संघटनेचे एक पथक सातार्‍यात पाठवले. जव्हार येथून सीता घाटाल (महिला जिल्हा उपप्रमुख पालघर),अजित गायकवाड (जिल्हा युवक सचिव पालघर व पंचायत समिती सदस्य आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जावून मजुरांची भेट घेतली. तकोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिराजदार आणि तहसीलदार कोडे यांना घेऊन त्या मजुरांना मुक्त करण्यात आले. पोलिसांनी कृष्णा नडगे यांचा जबाब घेतला असून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू आहे.

Back to top button