सातारा : लूटमारीतील दोघे संशयित निघाले दहशतवादी | पुढारी

सातारा : लूटमारीतील दोघे संशयित निघाले दहशतवादी

विठ्ठल हेंद्रे

सातारा :  एप्रिल 2023 मध्ये सातार्‍यातील महामार्गावरील गणपती सिल्क साडी सेंटर या दुकानात दोन बंदूकधारींनी लूटमार करत 1 लाख रुपये लुटून नेेले होते. या घटनेत दोघा दहशतवाद्यांचे कनेक्शन समोर आले होते. दहशतवादी विरोधी (एटीएस) व राष्ट्रीय सुरक्षा (एनआयए) विभागाला या प्रकरणी पुण्यात महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले आहेत.

सातारा शहरात आठ महिन्यांपूर्वी 8 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लूटमारीची घटना घडली होती. सातार्‍यातील अजंठा चौकात गणपती सिल्क साडी दुकान आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडल्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करण्याची तयारी सुरू होती. मॅनेजर दुकानाच्या काऊंटरवर हिशेब करत होते. दुसरीकडे दुकानातील 6 कर्मचारी आवराआवर करत होते. त्यावेळी तेथे दोघेजण आले. त्यांनी रिव्हॉल्व्हरसारखी बंदूक काढून ‘ये भाई उठो’, अशी धमकी दिली. संशयितांनी दुकानातील कोणीही गडबड करणार नाही हे पाहत बंदूक रोखून थेट दुकानदाराला धमकावले. त्यामुळे दुकानातील सर्वच कर्मचारी हादरून गेले. एकाने बंदूकीचा धाक दाखवल्यानंतर दुसर्‍या साथीदाराने दुकानातीलच पिशवी घेतली व त्यामध्ये तीन दिवसांपासूनची असलेली सुमारे एक लाख रुपयांची रोकड पिशवीत भरली.

अवघ्या पाच मिनिटांमध्ये दोन्ही चोरट्यांनी तेथून दुचाकीवरून रहिमतपूरच्या दिशेने भरधाव पोबारा केला. चोरटे गेल्यानंतर या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून नाकाबंदी करून चोरट्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना त्यात यश आले नाही. दरम्यान, जबरी चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी तपासाचे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलेच नाही.

पुण्यात असे सापडले संशयित…

काही दिवसांपूर्वी पुणे पोलिस गस्त घालत असताना त्यांना काही युवकांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीसह इतर प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. यामुळे पोलिसांनी संशयितांना पोलिस ठाण्यात नेऊन ते राहत असलेल्या ठिकाणाची झाडाझडती घेतली. यामध्ये त्यांच्या घरात आक्षेपार्ह वस्तू तसेच काही वॉरंट आढळून आले.

Back to top button