सातारा : चोरटी दारू विक्री करणारे अख्खे कुटुंब तडीपार | पुढारी

सातारा : चोरटी दारू विक्री करणारे अख्खे कुटुंब तडीपार

भुईंज; पुढारी वृत्तसेवा : देगाव (ता. वाई) येथे चोरटी दारू विक्री करणारे अख्खे कुटुंब तडीपार करण्यात आले आहे. कुटुंबातील चार सदस्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तडीपार केलेल्यांमध्ये कुटुंबातील आई, वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशोक वामन जाधव (वय 55), सविता अशोक जाधव (48), अमर अशोक जाधव, अमित अशोक जाधव (19, सर्व रा. देगाव, ता. वाई) अशी तडीपार केलेल्या संशयितांची नावे आहेत.

जाधव कुटुंंबियांकडून देगावसह भुईंज परिसरात चोरटी दारूची विक्री होत होती. याप्रकरणी अनेकदा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, यानंतरही त्यांच्या वर्तणूकीत कोणताच बदल होत नव्हता. तसेच त्यांच्यावर दारूची चोरटी वाहतूक, गंभीर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील संशयितांना दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये कायदेशीर कारवाई करूनही जामिनावर बाहेर आल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईचा कोणताच परिणाम झाला नाही.

त्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यासाठी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी केली होती. या प्रस्तावावर सुनावणी होवून सर्व संशयितांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.

Back to top button