जिल्हा न्यायालयात आता वैद्यकीय मदत कक्ष | पुढारी

जिल्हा न्यायालयात आता वैद्यकीय मदत कक्ष

सातारा; पुढारी वृत्तसेवा : आपत्कालीन परिस्थितीत न्यायालयात येणार्‍यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा न्यायालयामध्ये वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संशयित किंवा पक्षकारांना आवश्यकता भासल्यास समुपदेशनाची सोयही या कक्षामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

न्यायालयामध्ये दररोज संशयित तसेच पक्षकार मोठ्या प्रमाणावर येत असतात. तसेच वकिलांची संख्याही मोठी असते. न्यायालयांमध्ये अनेकदा असे प्रसंग उद्भवतात की, ज्यावेळी संबंधिताला वैद्यकीय साहाय्यतेची गरज भासते. परंतु, यापूर्वी न्यायालयामध्ये तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, अशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे न्यायालयातून बाहेर रुग्णालयापर्यंत नेताना प्राथमिक उपचार उपलब्ध होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयामध्ये वैद्यकीय कक्ष सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुख्य जिल्हा न्यायाधीशांशी वैद्यकीय कक्ष सुरू करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात एक कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कक्षामध्ये दररोज एक याप्रमाणे पाच वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. हे वैद्यकीय अधिकारी दुपारी 12 ते 3 या कालावधीत या कक्षामध्ये उपलब्ध असतात. दरम्यान, न्यायालयीन कामकाजादरम्यान अनेकजण तणावात असतात. त्यांना मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे या कक्षात वैद्यकीय अधिकार्‍यांकडून समुपदेशनाचीही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Back to top button