

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक धोकादायक ठिकाणे बनली आहेत. महामार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 116 बळी गेले असून अनेकजण जायबंदी झाले आहेत. सहापदरीकरणाच्या कामातील दिरंगाई व गलथान कारभारामुळे अनेकांचा बळी गेला आहे. महामार्ग प्राधिकरण तसेच प्रशासनाने अपघातांची जबाबदारी घेऊन अपघात होऊ नये यासाठी आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
ज्या ठिकाणी सहापदरीकरणाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी सुसज्ज 108 रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याची गरज आहे. अनेकदा याच ठिकाणी अपघात झालेले आहेत. अपघातग्रस्त जखमींना वेळेवर मदत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे.
सहापदरीकरण सुरु असलेल्या ठिकाणी अरुंद रस्त्यांतून दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने मार्ग काढत असतात, कोणतीही मार्गिका नसल्यामुळे वाहनांच्या रांगातून अनेक जण नियम धाब्यावर बसवून वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. तसेच रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसल्यामुळे आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.