सातार्‍याजवळ युवतीचा अपघातात मृत्यू

सातार्‍याजवळ युवतीचा अपघातात मृत्यू

खेड; पुढारी वृत्तसेवा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील संगमनगर येथे दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील युवती रस्त्यावर कोसळल्यावर ट्रक अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसर हेलावून गेला. दिशा उदय घोरपडे (वय 19, रा. सदरबझार, सातारा) असे मृत युवतीचे नाव असून, ती डी.फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

याबाबत माहिती अशी, रविवारी सकाळी 9.30 दिशा दुचाकी (एमएच 11 बीपी 6329) वरून सोनगाव येथून सातार्‍याकडे निघाली होती. सोबत असणारी तिची मैत्रीण दुसर्‍या दुचाकीवरून संगमनगर रस्त्यावरून पुढे गेली. त्याचवेळी येथील पेट्रोल पंपानजीक असलेल्या एका स्टिल दुकानासमोर दुभाजकासाठी सोडलेल्या जागेवर पडलेल्या खडीवरुन दिशाची दुचाकी घसरली व ती जमिनीवर कोसळली. त्यावेळी पाठीमागून वेगात येणार्‍या ट्रकने (एम.एच. 46 ए.एफ 5447) तिला ठोकरले. ट्रकचे उजव्या बाजूकडील पुढील चाक रस्त्यावर पडलेल्या दिशाच्या डोक्यावरून गेले. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. दिशाच्या किंकाळ्यांनी परिसर भेदरुन गेला होता. वाहतूकही ठप्प झाली. अपघातानंतर ट्रकचालक व क्लिनर दोघेही पळून गेले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून युवतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. युवतीची अवस्था पाहून नागरिकही हादरुन गेले होते. अपघातानंतर दिशाची मैत्रिण तेथे आली. तिने तात्काळ कुटुंबियांना त्याची माहिती दिली. दिशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी प्रमोद नानासाहेब घोरपडे (वय 58, रा. सदरबझार, सातारा) यांनी ट्रक चालक प्रशांत चांगदेव निंबाळकर (वय 43, रा. चिंचणी पो. डिस्कळ ता. खटाव) याच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रमोद घोरपडे हे दिशाचे चुलते आहेत. दिशाचे आई-वडील शिक्षक असून तिला एक बहीण आहे. जिल्हा सर्वसाधारण रूग्णालयात दिशाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर शिरढोण येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उद्या माहुली पुलावर रास्ता रोको…

बॉम्बे रेस्टाँरंट ते संगममाहुली रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करताना अनेक त्रुटी राहिल्या असून, रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व वाहनचालकांचा आहे. काँक्रिटीकरण केल्यानंतर दुभाजकासाठी सोडलेल्या जागेवर तसेच रस्त्यावर खडी मोठ्या प्रमाणावर पडली आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. यातच आज दिशा घोरपडे हिचा बळी गेला. रस्त्याच्या कामातील त्रुटींबाबत संबंधित ठेकेदार व महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देऊनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने मंगळवार, दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता माहुली पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news