चार राज्यांचं राहू द्या; महाराष्ट्रात परिवर्तन होणारच : शरद पवार | पुढारी

चार राज्यांचं राहू द्या; महाराष्ट्रात परिवर्तन होणारच : शरद पवार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : चार राज्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. ते निकाल अपेक्षितच होते. त्या राज्यात मी प्रचाराला काही गेलो नव्हतो. पण, या राज्यांचं राहू द्या; महाराष्ट्रात मात्र परिवर्तन होणारच, असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील जे सोडून गेले त्यांच्या ठिकाणी नवे चेहरे देऊन त्यांना निवडून आणणारच, असा द़ृढ विश्वासही बोलून दाखवला.

दरम्यान, मराठा आरक्षण हे दुसर्‍याच्या ताटातील काढून कोणाला देऊ नये, ही आमची भूमिका आहे. मराठा आरक्षणासाठी दुसरेही पर्याय आहेत. देशात जातनिहाय जनगणना करा, त्यानंतरच आरक्षणा संदर्भातील वस्तुस्थिती समोर येणार असल्याचेही ते म्हणाले.

खा. शरद पवार रविवारी सातारा दौर्‍यावर आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर मते मांडली. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, बंडू ढमाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. शरद पवार म्हणाले, चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. हे निकाल अपेक्षितच होते. तेलंगणात सत्ताधारीच पुन्हा सत्तेत येतील, असे एक चित्र दिसून येत होते. पण, राहुल गांधी यांच्या हैद्राबाद येथील सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तेथील चित्र बदलले. चार राज्यांच्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले, या राज्यात मी प्रचाराला काही गेलो नव्हतो. मात्र, तेथील माहिती घेवू. या राज्यातील निकालांचं सोडून द्या; महाराष्ट्रात मात्र परिवर्तन होणारच आहे. काँग्रेसने निवडणुकांमध्ये ईव्हीएमवर शंका घेतल्याबाबत ते म्हणाले, मी ईव्हीएमला दोष देणार नाही. याबाबत मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये सर्व विषयांवर चर्चा होईल.

मराठा आरक्षणाबाबत छेडले असता खा. पवार म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. दुसर्‍याच्या ताटातील काढून घेऊ नये ही भूमिका घेतली असून अन्य घटक न दुखवता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. केंद्र शासनानेही याबाबत निर्णय घेण्याचा ठराव घ्यावा, अशी सूचनाही केल्याचे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र बसून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

ना. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत खा. पवार म्हणाले, आरक्षणासंदर्भातील या सर्व घडामोडींमागे भाजपाचा हात आहे असा समज लोकांमध्ये आहे. ओबीसीचा एक वर्ग जनगणना करा असे म्हणतोय तर दुसर्‍या वर्गाला आरक्षण कमी होईल याची भिती आहे. आरक्षणाच्या मुद्यामुळे सामान्य जनतेचे प्रश्न बाजूला राहिले आहेत. काही राज्यात अतिवृष्टी झाली आहे. शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. मागील दौर्‍यात आ. मकरंद पाटील यांनी केलेल्या प्रवासाबाबत छेडले असता खा. पवार यांनी लोकं भेटावयास येतात त्याप्रमाणे ते आले असल्याचे सांगून बोलणे टाळले.

उदयनराजेंचं मन कुठं कुठं लागत नाही, याची खासगीत माहिती द्या…

अजित पवार हे सातार्‍यातून लोकसभेचा उमेदवार देणार आहेत. त्यामुळे खा. उदयनराजेंची गोची होऊ शकते का? या प्रश्नावर खा. शरद पवार म्हणाले, इतर पक्षांनी कोणता उमेदवार उभा करावयाचा हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आहे. तो निवडून कसा आणावयाचा हा प्रश्न आमच्यासमोर असून आम्ही बाकीच्या प्रश्नात लक्ष घालत नाही. उदयनराजेंचे भाजपामध्ये मन लागत नाही, असे निदर्शनास आणून देताच पवार म्हणाले, माझी आणि खा. उदयनराजेंची भेट नाही. पण, त्यांचं मन कुठं कुठं लागत नाही, याची माहिती खासगीत द्या, असे सांगताच हशा पिकला.

Back to top button