ऐतिहासिक वाघनखं नवीन वर्षात सातार्‍यात | पुढारी

ऐतिहासिक वाघनखं नवीन वर्षात सातार्‍यात

सातारा; पुढारी वृत्तसेवा : हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी किल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा वाघनख्यांद्वारे बाहेर काढला होता. त्यांची ही ऐतिहासिक वाघनखं नोव्हेंबरमध्ये लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखं 3 वर्षे आपल्या देशात राहणार आहेत. जानेवारी 2024 या नववर्षात पहिल्यांदा सातार्‍यात येणार असून येथे ती वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर व नागपूर येथेही इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी ती उपलब्ध होणार आहेत.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी वाघनखं सातारकर आणि शिवप्रेमींना पाहता येणार असून त्यासाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्यावतीने वेगाने तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यांच्या सहाय्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती ऐतिहासिक वाघनखे मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा नगरीत तमाम सातारकरांना पाहता येणार आहेत. ‘शिवशस्त्रशौर्य’ असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधीत तलवार व वाघनखे ही इंग्रजांनी भारतातून इंग्लंडला नेली होती. त्यामधील भवानी तलवार सेंट जेम्स पॅलेसमध्ये रॉयल कलेक्शनचा भाग आहे आणि वाघनखं (वाघांचे पंजे) इंग्लंडमधील व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट संग्रहालयाच्या संग्रहाचा भाग आहेत.

सातार्‍यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात एक वर्षे ही वाघनखं ठेवण्यात येणार आहेत. ही वाघनखं प्रदर्शित करणे, त्याची सुरक्षा तसेच त्याचा प्रवास हा अतिशय जोखमीचा व जबाबदारीचा आहे. प्रदर्शनाच्या अनुषंगाने प्रदर्शनाची व्यवस्था, सुरक्षेच्या अनुषंगाने राज्य सरकारच्यावतीने सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती गठित करण्यात आली आहे. सध्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात वाघनखं व इतर वस्तुंसाठी गॅलरी बनवण्याचे काम सुरू आहे.

ऐतिहासिक महत्त्व…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग समस्त जनतेला कायम प्रेरणादायी आहेत. किल्ले प्रतापगड येथे 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाने केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून ही वाघनखे वापरून खानाचा वध केला होता, तीच ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.

सर्वात प्रभावी गुप्त शस्त्र

वाघनखं उत्कृष्ट पोलादापासून बनवली असून अतिशय प्रमाणबध्द आहेत. एक पट्टी त्यावर खालच्या बाजूस बसवलेल्या चार नख्या आणि वरच्या बाजूस अंगठा असे या वाघनखाचे स्वरूप आहे. ही वाघनखं डाव्या हाताची असल्यामुळे त्यातील लहान अंगठी करंगळीत तर मोठी अंगठी तर्जनींच्या बोटात जाते मग चार नखे चार बोटांच्या बरोबर खाली येतात अगदी वाघाच्या पंजाप्रमाणे हे सर्वात लहान व सर्वात प्रभावी गुप्त शस्त्र आहे.

Back to top button