सातारा : कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन ठरतेय मैलाचा दगड | पुढारी

सातारा : कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन ठरतेय मैलाचा दगड

अशोक मोहने

कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कराड येथे प्रतिवर्षी भरणारे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी,औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी मैलाचा दगड ठरले आहे. यावर्षी प्रदर्शनात गर्दीचा विक्रम झाला. पाच दिवसात दहा लाखांहून अधिक शेतकरी, युवक, महिला, युवती, शालेय विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक यांनी प्रदर्शनास भेट दिली.

कृषी प्रदर्शन प्रतिवर्षी अधिकाधिक बहरत आहे. कराड बाजार समिती, राज्य शासन कृषी विभाग यांच्या यांच्या वतीने हे प्रदर्शन भरविले जात आहे. शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, टोकणीपासून ते लागवडीपर्यंत आणि काढणीपासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंतची माहिती शेतकर्‍यांना व्हावी हा हेतू सफल होत आहे. शेती औजारे, बी- बियाणे, खते यांची अभ्यासपूर्ण माहिती देणार्‍या स्टॉलवर शेतकर्‍यांची अधिक गर्दी दिसून आली. युवा शेतकर्‍यांना दिशा देणारे हे प्रदर्शन ठरत आहे.

थंडीत आलेला आंबा, शेवग्याएवढी चवळीची शेंग, भलेमोठे सिताफळ, जम्बो ड्रॅगनफ्रुट, हाता न मावणारा पेरु, कलमी आंबा यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या भाजीपाला, फळा-फुलांनी कृषी प्रदर्शात लक्ष वेधले. कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या शेतमालाची विक्री व्यवस्थाही प्रदर्शनात केली होती. प्रदर्शनात माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कृषीशी संबंधित स्टॉलना भेटी दिल्या.

कृषी प्रदर्शनात पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने सांभाळलेल्या पशूधनाने प्रदर्शन गाजले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपली देखणी जनावरे या प्रदर्शनात आणली होती. प्रदर्शनात गाय, बैल व म्हैस प्रदर्शन व स्पर्धा असल्याने शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. विलास गणपती नाईक (रा.मंगसुळी जिल्हा बेळगाव) यांचा दिड टनाचा रेडा व ईब्राहिम शेख (रा.कराड) यांची 27 लिटर दूध देणारी जाफराबादी म्हैस प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. पृथ्वीराज सर्जेराव पाटील (रा.शिगाव ता.जिल्हा सांगली) यांची काजळी खिलार जातीची गाय, दत्तात्रय प्रभाकर जाधव (रा.खतगुन ता.खटाव) यांचा कोसा खिलार जातीचा बैल, मुजिर मांगलगीर (रा.कराड) यांचा पोंगनुर जातीचा कमी उंचीचा बैल, जगन्नाथ देवकर (रा. येलूर ता.वाळवा) यांची सव्वा फूट लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस व बापुराव तानाजी मारे (रा.कापिल ता.कराड) यांची कोकण कपिला जातीच्या गायीने सर्वांचे लक्ष वेधले.

Back to top button