सातार्‍यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार | पुढारी

सातार्‍यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारी रात्री ढगफुटीसद़ृश झालेल्या पावसाने हाहाकार उडवला. हंगामात झाला नाही असा धो धो पाऊस कोसळला. त्यामुळे सातार्‍यातील गोडोली, विसावा नाका, शाहूनगर, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील घरे व दुकानांत पाण्याचे लोट शिरले. प्रचंड नुकसान झाले. तालुक्यात अनेक ठिकाणचे ऊस भुईसपाट झाले, ज्वारी पडली. मळणीसाठी कापून ठेवलेले भात भिजले. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे जनजीवन कोलमडून पडले.

सातारा शहरासह जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जोरदार पाऊस सुरू झाल्याने शहरातील सर्व वर्दळीचे रस्ते सुनसान झाले. बघता बघता पावसाचे प्रमाण वाढू लागले. रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहू लागले. मुख्य रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुमारे 4 तासांहून अधिक काळ ढगफुटीसद़ृश पडलेल्या पावसामुळे सर्वत्र शहर व तालुक्यात हाहाकार उडाला.

सखल भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शाहूनगर, गोडोली, मंगळवार पेठ, समर्थ मंदिर, केसरकर पेठ, सदर बझार व अन्य परिसरातील काही घरे व दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे दुकानांसह घरातील साहित्य भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. राडारोड्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.

नागरिकांनी सकाळपासून दुकानांत व घरांत शिरलेला राडारोडा काढण्याचे काम सुरू केले होते. काही ठिकाणी घरांच्या संरक्षक भिंती कोसळल्या. तर काही ठिकाणी गटाराचे पाणी व राडारोडा रस्त्यावर आला. त्यामुळे रस्त्यावर राडारोडा निर्माण झाल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले होते. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या, तर काही ठिकाणी जाहिरात फलकांचेही नुकसान झाले.

Back to top button